Sat, Jul 20, 2019 11:08होमपेज › Konkan › जिल्ह्यात श्रावणसरींना प्रारंभ

जिल्ह्यात श्रावणसरींना प्रारंभ

Published On: Aug 14 2018 1:07AM | Last Updated: Aug 13 2018 10:56PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात श्रावणसरींना प्रारंभ झाला असून, श्रावणाच्या पहिल्या सोमवारी जिल्ह्यात पावसाने संततधार ठेवली आहे. गेल्या आठवड्यात पावसाने पाठ फिरवली असताना कृषीक्षेत्रात चिंता व्यक्‍त करण्यात येत होती. मात्र, आता श्रावणसरींना सूर गवसल्याने भात शिवारात उत्साह आहे. दरम्यान, 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. 

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे भात शिवारांचे सर्वेक्षण करून पीकस्थितीचा अहवाल देण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या होत्या. मात्र, रविवारपासून सुरू झालेल्या श्रावण महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात श्रावणसरींना सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2747 मि. मी. च्या सरासरीने मजल पावसाने गाठली आहे. सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात झाला असून तालुक्यात पावसाने साडेतीन हजारांचा टप्पा गाठला आहे.  

जिल्ह्यात श्रावणाच्या पहिल्या सोमवारी 41.44 मि. मी.च्या सरासरीने 373 मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड 45, दापोली 49, खेड 44, गुहागर 10, चिपळूण 28, संगमेश्‍वर 40, रत्नागिरी 17, लांजा 13 तर राजापूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 127 मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, ‘आयएमडी’ने आगामी दोन दिवस जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.