Mon, Jul 22, 2019 05:02होमपेज › Konkan › ‘अवकाळी’चा पिच्छा

‘अवकाळी’चा पिच्छा

Published On: May 11 2018 1:38AM | Last Updated: May 10 2018 10:55PMरत्नागिरी : प्रतिनिधी

ओखी वादळाच्या दणक्यानंतर कोकणात अवकाळी पावसाची मालिका कायम आहे. डिसेंबर ते मे या सहा महिन्यांच्या कालावधीत वातावरणातील बदलाने सरासरी दोन दिवस अवकाळी पावसाचे ग्रहण कोकणचा पिच्छा पुरवित आहे. 

गुरुवारीही सकाळच्या सत्रात मळभी वातावरणात अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. तर गणपतीपुळे, मालगुंडसह नेवरे आणि आरेवारे या सागरी पट्ट्यासह शहरी भागात साळवी स्टॉप आणि कुवारबांव परिसरात जोरदार पावसाच्या सरी पडल्या. तर काही भागात अवकाळीने हलका शिंतोडा केला. त्यामुळे तापलेल्या या वातावरणात थोडावेळ गारवा निर्माण झाला.  

कोकणात 6 डिसेंबर 2017  रोजी ओखी वादळाने तडाखा दिल्यानंतर वातावरणातील चढउतार कायम राहिला. त्यामुळे जानेवारी, ते आतापर्यंत मे महिन्यात देखील  अवकाळी पावसाचे संकट कायम राहिले होते. आंबा हंगामाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये  अवकाळीने फळगळती झाली. त्यानंतरही हे सत्र सुरूच राहिले. मार्च महिन्यात तर रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, संगमेश्‍वर आणि रत्नागिरी तालुक्यात वादळी पाऊस झाला.  त्यामुळे आंबा हंगामाच्या प्रत्येक टप्प्यावर अवकाळी पावसाने गाठल्याने यंदाचा आंबा हंगामालाही ग्रहण लागले. प्रतिकूल हवामानाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला.

आता शेवटच्या टप्प्यातही अवकाळीचा शिंतोडा जिल्ह्यात गुरूवारी झाला. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या आंबा उत्पादकांसह व्यावसायिकांचीही धास्ती वाढली आहे. उत्पादन कमी झाल्याने त्याचा परिणाम आता शेवटच्या टप्प्यात  आंबा वेळेआधीच कॅनिंगकडे सरकू लागला आहे. शेवटच्या टप्प्यातील तयार उत्पादन बाजारपेठ गाठण्याच्या तयारीत आहे. मात्र, गुरूवारी पावसाने या मनुसब्यावरही पाणी फेरल्याची  भीती आंबा व्यावसायिकांनी व्यक्‍त केली .

आगामी 24 तासांत कोकणात पावसाची शक्यता

मार्चमध्ये कोकणात वादळी पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली होती. त्यानुसार या वादळी पावसाचा तडाखा रत्नागिरी जिल्ह्यात तीन तालुक्यांना बसला होता. आगामी 24 तासांतही कोकणात विशेष करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पाऊस होण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने हवाई संदेशाद्वारे दिली आहे.  आगामी 24 तास दिवसभर वातावरण मळभी राहणार आहे.