रत्नागिरी : प्रतिनिधी
कोकणात यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला. सुरुवातीला मुसळधार बरसल्यानंतर गेल्या आठवड्यात पावसाने ‘ब्रेक’ घेतला. मात्र, आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी पावसाने पुन्हा हजेरी लावत धुवाँधार बरसण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. या पावसामुळे शेतकर्यांतूनही समाधान व्यक्त होत असून, शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे.
जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पावसाने थोडी उघडीप दिली होती. पण, रविवारी पहाटेपासून पुन्हा अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत होत्या. दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर संध्याकाळी मात्र पुन्हा पावसाला सुरुवात झाली.
जिल्ह्यात सर्वदूर हजेरी
जोरदार झालेल्या पावसाच्या सरींमुळे नदी-नाल्यांना पाणी आले आहे. चिपळूण, सावर्डे, मार्गताम्हाने, रामपूर, अलोरे, शिरगाव, पोफळी, दसपटी, परशुराम या भागातही जोरदार पाऊस बरसला. याशिवाय उत्तर रत्नागिरीतील खेड, दापोली, गुहागर आणि मंडणगड येथेही पाऊस सुरु झाला आहे.दक्षिण रत्नागिरीतील लांजा, राजापूर तालुक्यांना पावसाने झोडपले. तर संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात सकाळपासून सरीवर सरी असा पाऊस पडत होता.
रविवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला होता. तो काही अंशी खरा ठरला आहे. सकाळपासूनच पावसाला जोरदार सुरूवात झाली. दिवसभरात विश्रांती घेत सरीवर सरी असा कोसळणारा पाऊस सायंकाळी ओसरला. मात्र मळभी वातावरण कायम होते.