रायगड : प्रतिनिधी
गेल्या चोवीस तासात महाड शहर व परिसरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सकाळपासून महाड शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान सावित्री गांधारी व काळ नदी दुथड्या भरून वाहू लागल्या आहेत. या नदीचे पाणी शहरात दस्तुरी नाका, गांधारी नाका व सुकट गल्ली परिसरात शिरल्याची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षातून तसे महाडनगरपालिकेकडून देण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्याकरिता पालिकेकडून दोन वेळा भोंगे वाजवण्यात आले आहेत. खरवलीच्या धरणावरून पुराचे पाणी वाहत असल्याने खरवली बिरवाडी रस्ता बंद झाला आहे.
महाड शहरातून रायगड रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर कोकरे गावाच्या हद्दीत रस्त्यावर पाणी आल्याने रायगडकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. महाड औद्योगिक वसाहत व लागून असलेल्या खरोली बिरवाडी मार्गावरील धरणावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.