Sat, Jul 20, 2019 09:20होमपेज › Konkan › नाणार लढ्यात राहुल गांधीही उतरणार

नाणार लढ्यात राहुल गांधीही उतरणार

Published On: Apr 29 2018 11:14PM | Last Updated: Apr 29 2018 11:14PMराजापूर : प्रतिनिधी

नाणार पेट्रोकेमिकल लढ्यात आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी उतरले आहेत. समृध्द कोकणच्या बचावासाठी लढणार्‍या जनतेसमवेत आपण राहू, असा जाहीर पाठिंबा त्यांनी दिला आहे. कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम व त्यांच्या सहकार्‍यांनी दिल्ली येथे गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे नाणारचा लढा आता देशपातळीवर पोहोचला आहे.

दोन आठवड्यांपूर्वी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ नाणार दौर्‍यावर येऊन गेले होते. त्यावेळी प्रकल्प परिसराची पाहणी झाल्यावर त्याचा अहवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना सादर करण्यात आला होता. तो अहवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना शनिवारी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी सादर करण्यात आला.

खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत गेलेल्या शिष्टमंडळात कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम व त्यांचे सहकारी, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे - पाटील, आमदार भाई जगताप, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम उपस्थित होते.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, अशोक वालम व  प्रकल्प विरोधकांनी नाणार मधील वस्तुस्थिती राहुल गांधी यांना सांगितली. त्यावेळी वालम व त्यांच्या सहकार्‍यांचे म्हणणे राहुल गांधींनी ऐकून घेतले.

अशा विनाशकारी प्रकल्पामुळे कोकणचे वैभव नष्ट होणार असून हा  प्रकल्प कोकणात नको. कोकणातील गोरगरीब शेतकर्‍यांची जमीन कंपनी बळकवणार आहे. त्यासाठी सुरु असलेल्या लढ्याला आपला पाठिंबा असेल असे आश्‍वासन राहुल गांधी यांनी दिले.

काँग्रेस अध्यक्षांनी रिफायनरीविरोधी लढ्यात उडी घेतल्याने रिफायनरी प्रकल्पाचा लढा आता देशव्यापी झाला आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने रिफायनरी विरोधात रणशिंग फुंकले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण,  राज्य प्रभारी मोहन प्रकाश व अन्य नेते 2 मे रोजी नाणार दौर्‍यावर येत आहेत. शिवसेनेनंतर आता काँग्रेसनेही विरोध दर्शविल्याने आगामी काळात रिफायनरी विरोधाचा मुद्दा आणखीच उग्र बनणार, अशी चिन्हे दिसत आहेत.