Thu, Jun 27, 2019 00:17होमपेज › Konkan › बॉक्सवेलसाठी महामार्गावर ठिय्या

बॉक्सवेलसाठी महामार्गावर ठिय्या

Published On: Apr 24 2018 11:17PM | Last Updated: Apr 24 2018 11:17PMकुडाळ ः वार्ताहर

महामार्ग चौपदरीकरणात तेर्सेबांबर्डे-मळावाडी येथे बॉक्सवेल बांधावा, या मागणीसाठी तेर्सेबांबर्डे मांडकुली व भोयाचे केरवडे येथील सरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांनी महामार्गावर लाक्षणिक ठिय्या आंदोलन छेडले. या आंदोलनाची दखल घेत महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश शेडेकर यांनी आंदोलनस्थळी जात आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तूर्त मागे घेतले. गुरुवार, 10 मेपर्यंत मागण्यांची पूर्तता करावी; अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन करू, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी श्री. शेडेकर यांना दिला.  

कुडाळ तालुक्यात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या महामार्गामुळे  भविष्यात आपल्याला त्रास होणार याची जाणीव येथील ग्रामस्थांना झाल्यामुळे सुरुवातीला झाराप त्यानंतर कुडाळ व आता तेर्सेबांबर्डे-मळावाडी येथील ग्रामस्थांनी विरोधाची भूमिका घेत  महामार्गाचे काम करा; पण आमच्या मागण्या पूर्ण करा, अशी भूमिका घेत मंगळवारी ठिय्या आंदोलन सुरू केले.  महामार्गाच्या पलीकडे शेतकर्‍यांची शेती, नदीवर पाण्यासाठी गुरांचा प्रवास, पलीकडे स्मशानभूमी असल्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी ये-जा कशी करावी? मांडकुली, भोयाचे केरवडे या दोन गावांना जोडणारा तेर्सेबांबर्डे -मळावाडी येथे बॉक्सवेल बांधल्यास आमचा प्रश्‍न मार्गी लागेल. त्यासाठी बॉक्सवेल बांधा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या संदर्भात जिल्हाधिकारी  यांना या तिन्ही गावच्या ग्रामपंचायतीमार्फत निवेदनेही देण्यात आले आहे.  जिल्हाधिकारी प्रशासनाने यावर केवळ ग्रामस्थांच्या दृष्टीने समाधानकारक कार्यवाही करावी, असा शेरा मारून महामार्ग  विभागाला पत्र देण्याचीच कार्यवाही केली. त्यामुळे तीनही गावातील संतप्त ग्रामस्थांनी अखेर मंगळवारी रस्त्यावर उतरत प्रस्थावित मागणीच्या ठिकाणीच लाक्षणिक ठिय्या आंदोलन छेडले.  महामागर्र् विभागाचे उपकार्य अभियंता श्री. शेडेकर यांनी आंदोलनस्थळी ग्रामस्थांची भेट घेत चर्चा केली.  यावेळी श्री. शेडेकर यांनी महामार्ग चौपदरीकरण कामाचा आराखडा  पूर्णतः तयार झाला असून त्यात कोणताही बदल करायचा झाल्यास  त्याचा वाढीव खर्च व वाढणारा वेळ  याचा प्रशासन स्तरावरून गांभिर्याने विचार केला जातो. यासाठी तांत्रिक मंजूरीसाठी एक समिती काम करते. त्यामुळे ग्रामस्थांच्या या मागणीचा विचार  करून आपण तसा प्रस्ताव ग्रामस्थांच्या उपस्थितीत आपल्या कार्यालयात तयार करून तो  तात्काळ पाठवू यासंदर्भात आपण काय कार्यवाही  करणार आहोत, याचे लेखी उत्तर तत्काळ बुधवारपर्यंत तिन्ही ग्रामपंचायतींना पाठवले जाईल. मात्र ग्रामस्थांनी तोपर्यंत आपल्या नियमानुसार  व टेंडरनुसार  काम करू द्या अशी विनंती केली. यावेळी उपस्थित जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी  यांच्याशी महामार्ग प्रकल्पग्रस्तांची भेट निश्‍चित करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी आपले म्हणणे  सादर करावे असे सुचित केले. ग्रामस्थांनी या सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी  10 मे ची मुदत दिली आहे. माजी उपसभापती बबन बोभाटे, पं.स. सदस्य मिलिंद नाईक, स्वाभिमानचे कुडाळ तालुकाध्यक्ष दीपक नारकर, दिनेश साळगांवकर, सचिन धुरी, समीर हळदणकर  आदींनी आंदोलनाला भेट देत पाठिंबा दिला. या आंदोलनात तेर्सेबांबर्डे सरपंच संतोष डिचोलकर, मांडकुली सरपंच तुषार सामंत, रूपेश कानडे,  दिलिप निचम, अजय डिचोलकर, बाबुराव सावंत, गुणाजी जाधव, सागर कोरगांवकर, सुर्यकांत कानडे, मधुकर दळवी,गुरूनाथ मराठे, केशव राणे, सौ. नयना कोरगांवकर, भागिरथी कानडे, सुप्रिया कानडे, दीप्ती कानडे, दीपिका कानडे, विमल केरकर, संजय डिचोलकर आदी उपस्थित होते.