Tue, Mar 26, 2019 01:32होमपेज › Konkan › हायवेतील प्रश्नांबाबत प्रसंगी कुडाळ बंदची हाक

हायवेतील प्रश्नांबाबत प्रसंगी कुडाळ बंदची हाक

Published On: Jul 03 2018 12:15AM | Last Updated: Jul 03 2018 12:15AMकुडाळ : काशिराम गायकवाड 

कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच हायवेच्या प्रश्नांबाबत वाचा फोडून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी राजकारण विरहीत एकत्र येण्याचे सोमवारी कुडाळवासिय व सर्वपक्षीयांनी एकमताने ठरविले. तसेच शहरातील हायवेच्या प्रश्नांबाबत गुरूवार दि. 5 जुलै रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. प्रशासनाकडून वेळीच अडीअडचणी दूर करून योग्य न्याय न मिळाल्यास प्रसंगी कुडाळ बंद ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

कुडाळ शहरातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामामुळे निर्माण होत समस्यांबाबत आवाज उठवून योग्य न्याय मिळावा यासाठी सोमवारी कुडाळ येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिराच्या धर्मशाळेत कुडाळवासिय व सर्वपक्षीयांची बैठक पार पडली. संजय पडते, काका कुडाळकर, अॅड.राजीव बिले, मिलिंद नाईक, बनी नाडकर्णी, बाळा वेंगुर्लेकर, सचिन काळप, प्रसाद गावडे, प्रसाद शिरसाट, गजानन कांदळगांवकर, राजन बोभाटे, एजाज नाईक, विजय वालावलकर, अॅड.समिर कुलकर्णी, केदार सामंत, राजन कुडाळकर, संजय बांदेकर, संतोष शिरसाट, प्रभाकर चव्हाण, संदेश पडते, सौ.प्रज्ञा राणे, सौ.स्वाती तेंडोलकर, राजू तेंडोलकर, अनंत कुडाळकर, श्री.साखळकर, शैलेश काळप, शेखर अंधारी, अॅड.अमित सावंत, अॅड.राजीव कुडाळकर, आत्माराम जाधव, सुरेश राऊळ, सुभाष सावंत-प्रभावळकर, सर्फराज नाईक, राजू बक्षी आदींसह शहरवासिय उपस्थित होते. 

कुडाळ शहरात अनेक प्रश्न आहेत. सांडपाणी प्रश्न, वाहतूक कोंडी यांसह विविध प्रश्नांना वाचा फोडून अन्यायाविरोधात एकत्रितपणे आवाज उठवून कुडाळचा सर्वांगिण विकास होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया असे यावेळी ठरविण्यात आले. कुडाळ ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, कुडाळात दुय्यम निबंधकांचे ऑफीस व्हावे यांसह विविध प्रश्नांवर एकत्रितपणे आवाज उठवण्याचे यावेळी ठरले. याशिवाय जिथे जिथे भ्रष्टाचार दिसेल तिथे सर्वांनी राजकीय पादत्राणे बाजून ठेवून संघटितपणे आवाज उठवण्याचे सर्वांनुमते ठरले.

महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भविष्यातही होणार आहेत त्यामुळे या प्रश्नांवर आवाज उठवून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रितपणे लढा देण्याचे यावेळी ठरविण्यात आले. तसेच याबाबत निवेदन संबंधित प्रशासनाकडे देण्याचे ठरले. काका कुडाळकर म्हणाले, हायवेला कोणाचाही विरोध नाही मात्र आराखडा प्रशासनाने दाखवावा आणि लोकांच्या हिताचे काम होऊन न्याय मिळावा हिच मागणी आहे. हायवेचे कुडाळ शहरातीलही प्रश्न सुटावेत. संजय पडते म्हणाले, सर्वांनी एकत्र येत कुडाळचे प्रश्न सोडवून शहराचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लावूया.भ्रष्टाचाराविरोधात संघटितपणे आवाज उठवूया. अॅड. राजीव बिले यांनी या बैठकीची संकल्पना सुरूवातीलाच स्पष्ट केली. ही पक्षीय बैठक नसून कुडाळच्या विकासासाठी सर्वजण राजकारण विरहीत एकत्र आल्याचे सांगून कुडाळच्या हिताकडे व प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने लक्ष ठेवूया असे सांगितले. हायवेची वृक्षतोड झाल्यानंतर वृक्षारोपण व्हावे, मंदिरांचे योग्य पद्धतीने पावित्र राखले जावे, हायवे झाल्यानंतर निर्माण होणारा टोल प्रश्न अशा अनेक समस्याबाबत आवाज उठविण्यासाठी अशाचप्रकारे सर्वांनी एकत्र लढा देऊया असे आवाहन अॅड. बिले यांनी करून अशीच बैठक दर आठ दिवसांनी घेऊन कुडाळच्या विकासात योगदान देऊया असे सांगितले. प्रसाद शिरसाट यांनी या बैठकीला काही पक्षांच्या प्रमुख पदाधिका-यांनी पाठ फिरवल्याबाबत नाराजी व्यक्त केली. गजानन कांदळगांवकर व अन्य उपस्थितांना विविध प्रश्नांवर चर्चा केली. या बैठकीत कुडाळच्या विकास विकास व हायवे प्रश्नांबाबत व्यापक चर्चा झाली.