Fri, Apr 26, 2019 18:07होमपेज › Konkan › खासगी बसवाल्यांकडून ‘शिवशाही’ची बदनामी

खासगी बसवाल्यांकडून ‘शिवशाही’ची बदनामी

Published On: Apr 17 2018 10:41PM | Last Updated: Apr 17 2018 10:14PMचिपळूण : खास प्रतिनिधी

खासगी बस व्यावसायिकांकडून सध्या एस.टी.च्या ‘शिवशाही’ बसची बदनामी होत आहे. ‘शिवशाही’ला वेग नाही, ए.सी.ला कूलिंग नाही अशाप्रकारे प्रवाशांची दिशाभूल सुरू असून ‘शिवशाही’ पासून प्रवाशांना दूर लोटण्याचा हा डाव आहे. सध्या जिल्ह्यात लांब पल्ल्याच्या मार्गावर 33 ‘शिवशाही’ बस धावत आहेत. यामध्ये दापोली एस.टी. आगाराचा पहिला क्रमांक आहे. 

सहा महिन्यांपासून राज्यात ‘शिवशाही’ गाड्या सुरू झाल्या. आता तळकोकणातही या गाड्या दिसू लागल्या आहेत. रत्नागिरी एस.टी. विभागात 33 गाड्या धावत असून यामध्ये दापोली एस.टी. आगारात सर्वात जास्त 13, त्या नंतर रत्नागिरीमध्ये 6, चिपळुणात 5, गुहागरमध्ये 4, खेडमध्ये 3, राजापूरमध्ये 2 ‘शिवशाही’ गाड्या दाखल झाल्या आहेत. प्रत्येक आगारातून लांब पल्ल्याच्या म्हणजेच मुंबई, पुणे व कोल्हापूर या मार्गावर ‘शिवशाही’ गाड्या सोडण्यात येत आहेत. अजूनही मंडणगड आणि लांजा आगाराला एकही ‘शिवशाही’ बस मिळालेली नाही. जिल्ह्यातील प्रत्येक आगाराची आणखी ‘शिवशाही’ गाड्यांची मागणी आहे. एकीकडे या गाड्यांची बदनामी सुरू असताना दुसरीकडे एस.टी. प्रवाशांनी मात्र ‘शिवशाही’ला पसंती दाखविली आहे. 

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वातानुकूलित ‘शिवशाही’ गाड्या प्रवाशांच्या पसंतीला उतरल्या आहेत. मात्र, खासगी आराम बस व्यावसायिक या गाड्यांविरोधात टीकेची झोड उठवत आहेत. घाटरस्त्याला गाड्या चढत नाहीत, ए.सी.ला कूलिंग नाही, खिडक्या नाहीत, गाडीमध्ये थंडी वाजते, उशिराने गाड्या धावतात, चालक खासगी आहेत अशा अनेक तक्रारी ‘शिवशाही’बाबत केल्या जात आहेत. ‘शिवशाही’ मुळे एस.टी. प्रवाशांना नाहक भुर्दंड पडत आहे, असेही बोलले जात आहे. 

‘शिवशाही’ गाड्यांमुळे खासगी आराम बस व्यवसायावर परिणाम होणार असून खासगी आरामबसने जाणारा प्रवासी ‘शिवशाही’ने मुंबई, पुण्याला जाणार आहे. त्यामुळे खासगी गाड्यांची प्रवासी संख्या घटणार असून हा धोका लक्षात घेऊनच ‘शिवशाही’ विरोधात दिशाभूल केली जात असल्याचे एस.टी. अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. चिपळूण आगारातून पाच गाड्या फक्‍त पुणे मार्गावर धावत आहेत. आणखी काही दिवसांत या आगारात पाच ‘शिवशाही’ गाड्या दाखल होणार असून त्या मुंबई मार्गावर धावणार आहेत. यामुळे दिवसेंदिवस प्रवाशांची ‘शिवशाही’ला पसंती मिळत आहे. प्रवाशांचे भारमान लक्षात घेऊन लांब पल्ल्याच्या मार्गावर ‘शिवशाही’ गाड्या मागणीनुसार सोडण्यात येणार आहेत.

प्रवाशांची लूट थांबणार...
कोकणातील गणेशोत्सव, शिमगोत्सव आणि मे महिन्यामध्ये मुंबई, पुण्याहून गावाला दाखल होणार्‍या चाकरमान्यांची खासगी ट्रॅव्हल्सकडून मोठी आर्थिक लूट केली जाते. प्रत्येक माणशी किमान हजार-पंधराशे रुपये प्रवासासाठी मोजावे लागतात. मात्र, आता मुंबई-पुणे मार्गावर ‘शिवशाही’ गाड्यांची संख्या वाढणार असल्याने सणासुदीला गावाकडे येणार्‍या प्रवाशांची लूट थांबणार आहे. यामुळे चाकरमान्यांची आर्थिक बचतच होणार आहे.