Tue, May 26, 2020 01:07होमपेज › Konkan › शाळेचा पहिला दिवस : सारं काही नवं.. हवंहवसं

शाळेचा पहिला दिवस : सारं काही नवं.. हवंहवसं

Published On: Jun 15 2018 11:49PM | Last Updated: Jun 15 2018 11:12PMचिपळूण : समीर जाधव

शाळेचा पाहिला दिवस... नवीन पुस्तके.. नवे दप्तर.. नवा वर्ग.. नवे शिक्षक... नवा गणवेश आणि सारे काही नवनवे...! खरोखरच शाळेची एक गंमतच असते ना..! आता मात्र गेल्या त्या आठवणी आणि राहिले ते दिवस असेच झाले आहे. तरीही निदान आपल्या पाल्याला शाळेत सोडण्याच्या निमित्ताने आई-बाबा शाळेच्या पहिला  दिवस अनुभवतात.

शाळेचे दिवस मंतरलेले होते. त्यावेळी आम्हाला पहिल्या दिवशी शाळेत सोडायला कोणी येत नव्हते.आपले आपणच शाळेत जाण्याची वेगळी मजा होती. आता मात्र दप्तर आणि डबा पालकांच्या हातात असतो आणि मुलाचे अगदी बोट धरून पालक शाळेत सोडायला येत असतात. शाळेच्या पहिल्या दिवशी असेच चित्र पहायला मिळते. मोटारसायकल, चारचाकी कार, रिक्षा अशा वाहनांतून मुलांना शाळेत सोडायला येणार्‍या पालकांची मोठी घाई असते.

आज पालकांमध्ये शिक्षणाविषयी अधिक जागरूकता निर्माण झाली आहे. पाल्याप्रती पालकांच्या आशा अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. या आशा-अपेक्षांचे ओझे अलीकडे दप्तराच्या ओझ्यापेक्षा अधिक झाले आहे. शासन दप्तराचे ओझे कमी करण्याचा विचार करीत आहे. पण दुसर्‍या बाजूला पालकांच्या आशा अपेक्षांचे ओझे कसे कमी होणार? हा गंभीर प्रश्‍न आहे. एकीकडे मुलांना नापास करायचे नाही असे धोरण असताना आता टक्केवारीचा उच्चांक गाठला जात आहे.दहावी परीक्षेत अगदी शंभर टक्केचा आकडादेखील ओलांडण्याची किमया विद्यार्थी करीत आहेत. त्यामुळे साहजिकच आपला पाल्य दहावीला गेल्यावर अधिकाधिक टक्केवारी मिळवण्याचे मानसिक दडपण विद्यार्थ्यांवर वाढत आहे. गुणांच्या वाढत्या स्पर्धेमुळे प्रवेश प्रक्रियादेखील कठीण होत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा व चुरस निर्माण झाली आहे. निकालांची वाढलेली टक्केवारी हा देखील अभ्यासाचा वेगळा विषय ठरेल मात्र अलीकडे शासनाने बदललेल्या अभ्यासक्रमात कौशल्य विकसित करणारा अभ्यासक्रम आणला आहे. त्यात अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याला आणि निर्मिती मूल्याला अधिक वाव दिलेला आहे. हे पाऊल स्वागतार्ह आहे. त्यामुळे पारंपरिक कारकून बनविणार्‍या शिक्षण पद्धतीला छेद जाईल आणि तंत्र शिक्षणात मुले पारंगत होतील. यंदा पहिली, पाचवी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात लक्षणीय बदल होत आहे. 

आजवर असलेला अभ्यासक्रम घोकंपट्टी करणारा होता. एखाद्या पाठावर असलेले प्रश्‍न आणि त्याची उत्तरे इतकेच मर्यादित स्वरूप होते. आता मात्र मुलांच्या कल्पनाशक्‍तीला आणि नवनिर्मितीला अधिक वाव मिळणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याचे याबद्दल अभिनंदन करायला हवे. ‘सीबीएसई’ धर्तीवर हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे येथे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा कस लागणार आहे. एकाच प्रश्‍नाचे उत्तर वेगवेगळ्या पद्धतीने कसे देता येते ही कला विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे. नाहीतर या आधी सार्‍या वर्गाचे मार्गदर्शक मधील पाठ केलेले उत्तर एक सारखे... ही परिस्थिती आता बदलणार आहे. आधीच्या पिढीने शिकलेला अभ्यासक्रम आणि आज शिकणार्‍या मुलांचा अभ्यासक्रम यात बदल झालेला आहे. त्यामुळे आज मुलांना शिकविताना... तुम्हाला नाही येणार हो... हे असे नाही...आम्हाला असे शिकविले आहे.  आता नवीन सिलॅबस आहे... तुम्हाला काही कळणार  नाही...अशी अनेक उत्तरे पालकांना ऐकायला मिळतात आणि त्यावेळी सर्वांनाच आपल्या शाळेचा पहिला दिवस व ते शालेय जीवन आठवते. या आठवणी भारावून टाकणार्‍या असतात. त्या आजच्या मुलांना सांगायला गेलात तरी त्यांना त्या खर्‍या वाटत नाहीत. यातच खरी गंमत असते. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस अनुभवताना मुलांबरोबरीने पालकही आपल्या भूतकाळात जातात आठवणीत रमतात. मुलांना वर्गात सोडून घरी परतताना आपले शालेय जीवन डोळ्यांसमोर उभे करतात. या शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच पालकांचीही शाळा सुरू होते..!