होमपेज › Konkan › रत्नागिरी जिल्ह्यात ‘पूर्व मोसमी’ला प्रारंभ

रत्नागिरी जिल्ह्यात ‘पूर्व मोसमी’ला प्रारंभ

Published On: Jun 02 2018 11:13PM | Last Updated: Jun 02 2018 10:48PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

जिल्ह्यात मोसमी पावसाची प्रतीक्षा सुरू असताना शनिवारी पूर्व मोसमी पावसाच्या सरींनी मान्सूनची चाहुल करून दिली. शनिवारी दिवसभरात एकूण 47.30 मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील तरुणाचा बळी घेतला. 

दिवसभर आच्छादित राहिलेल्या मळभी वातावरणात पावसाची वर्दी आली खरी; मात्र अनेक भागांत सायंकाळी चारनंतर पावसाचा हलका शिडकावा झाला. मात्र, त्यानंतर काही भागात पावसाच्या जोरदार सरींना सुरुवात झाली. हातखंबा येथे वीज पडल्याने पावसाच्या पहिल्या बळीची नोंद झाली. हातखंबा येथील तारवेवाडीतील पंकज हरिश्‍चंद्र घवाळी (वय 22) याचा वीज पडून जागीच मृत्यू झाला. साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास हातखंबा तारवेवाडी येथील पंकज घवाळी गोठ्याच्या बाहेर उभा होता. याचवेळी गोठ्याच्या बाहेर उभ्या असणार्‍या पंकजच्या अंगावर वीज कोसळली आणि क्षणात तो खाली कोसळला. निवळी येथील व्यापारी भाई जठार यांनी पंकजला उपचारासाठी  तत्काळ हॉस्पिटलमध्ये हलविले. मात्र, विजेचा झटका इतका तीव्र होता की, या धक्क्यातच पंकजची प्राणज्योत मालवली. या विजेच्या धक्क्याने आजूबाजूच्या घरातील वायरिंगदेखील जळून खाक झाले.

दिवसभरात पावसाच्या पहिल्या शासकीय दिवशी जिल्ह्यात एकूण 47. 30 मि.मी. पाऊस झाला. सरासरी पर्जन्यमान 5.26 मि.मी. नोंदवले. दरम्यान, पावसाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पावसाळा पूर्व सज्जता केली आहे. गतवर्षी आलेल्या ओखी वादळाच्या तडाख्यानंतर कोकणातील नियमित वातावरणात बदल होत गेले. तद्नंतर सलग पाच महिने अवकाळी पावसाने जिल्ह्याचा पिच्छा पुरविला होता. गेल्या पाच महिन्यांत सरासरी दोन दिवस अवकाळी पावसाचे सावट जिल्ह्यावर होते. मात्र, आता जिल्ह्यात मोसमी पावसाची प्रतीक्षा सुरू झाली आहे. शनिवारी मात्र पूर्व मोसमी पावसाने ही प्रतीक्षा काही प्रमाणात कमी केली. शनिवारी अनेक भागांत सायंकाळी पाऊस झाला.  रत्नागिरीसह संगमेश्‍वर ते मंडणगड सर्वच तालुक्यांत पूर्व मोसमीच्या सरी झाल्या. चिपळूण, लांजा, राजापूर तालुक्यांत मात्र पूर्व मोसमीने दणक्यात सुरवात केली. तर अन्य तालुक्यांत पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली.  पहिल्या पावसाळी महिन्याच्या  दुसर्‍या दिवशी म्हणजे शनिवारी सर्वाधिक पावसाची नोंद राजापूर तालुक्यात झाली. तर सर्वात कमी पाऊस दापोली तालुक्यात नोंदविला.

शनिवारी राजापूर शहरात पडलेल्या पावसामध्ये शहरातील ओगलेवाडी मध्ये  पिंपळाचे झाड घरावर पडून ते जमीनदोस्त झाल्याची घटना घडली. सुदैवाने घरातील मंडळींनी बाहेर धाव घेतल्याने ते बचावले अन्यथा मोठा धोका निर्माण झाला असता. या दुर्घटनेत ओगलेवाडीतील अजित करंबेळकर यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पहिल्याच पावसात तालुक्यात पडझडीची ही  पहिलीच  घटना घडली आहे .

संगमेश्‍वर तालुक्यातील आंगवली गावाला वादळाचा तडाखा बसल्याने अनेक घरांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. वादळाच्या तडाख्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे व विद्युत खांब वाकल्यामुळे वीजपुपवठा खंडित झाला आहे. आंगवलीतील अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. हायस्कूलचे पत्रे उडून गेले आहेत तर बौद्धवाडीतील सार्वजनिक विहिरीवर भले मोठे आंब्याचे झाड कोसळल्याने विहिरीचे मोठे नुकसान झाले आहे.