Mon, Mar 25, 2019 05:17
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › दगड आणि माती

दगड आणि माती

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 14 2018 11:01PMसचिन सनगरे, रत्‍नागिरी

दगड आणि माती या संदर्भात येणारे अभ्यास विषय आपल्याला कमी महत्त्वाचे वाटू शकतात, पण याचा संदर्भ जेव्हा पाण्याच्या विषयाशी येतो तेव्हा तेच विषय तेवढेच गंभीर व अभ्यासपूर्ण वाटतात. आपल्या आजुबाजूला असलेल्या भूपृष्ठीय रचनेवरून भूपृष्ठाखाली कोणत्या स्वरूपाचे जलसाठे असू शकतात याचे भाकीत फार थोडे भू अभ्यासक करू शकतात. आधुनिक यंत्रतंत्रांमुळे हे अधिक सोपे बनले आहे. त्याचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतो आहे कारण दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्यासंदर्भात निर्माण होणारे प्रश्‍न या प्रश्‍नांच्या उत्तरासाठी जमिनीत खोलवर खोदाई करून पाणीसाठे जमिनीवर आणले जातात आणि जमिनीखालील सुरक्षित जलसाठे नष्ट केल्याने निर्माण होणारा वातावरणातील शुष्कपणा अधिक वाढल्याने आरडाओरड केली जाते.

एकीकडे पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी मोठे श्रमदान केले जाते तर दुसरीकडे जलयुक्‍त शिवार सारखी योजना भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडते आहे. आपल्याला पाणी हवे का पैसा याचेच उत्तर कदाचित काही लोकांना सापडलेले नाही.  ‘एक गाव एक पाणवठा’ अशी घोषणा सामाजिक एकात्मतेसाठी केली गेली होती, आता ‘एका पाणवठ्यासाठी गाव’ अशी योजना निर्माण करणे आवश्यक आहे. पिण्यासाठी किंवा पिकासाठी पाणी पुरवठा करणे हे कोणत्याही सरकारचे काम नसून त्यासाठी आपणच नियोजनपूर्वक योजना बनवल्या पाहिजेत.आपल्या डोक्यावर पडणारा पाऊस आपल्याला वर्षभर वापरता आला पाहिजे ही संकल्पना आपल्या मनात रूजली पाहिजे, यासाठी आपल्या परिसरातील दगड आणि मातीचा थोडासा अभ्यास आपण प्रत्येकाने केला पाहिजे. 

भौगोलिक परिक्षेत्रानुसार जमिनीचा उंच, सखलपणा आणि त्या आधारे पाण्याच्या वहनाची दिशा आपल्याला समजल्यास कोणत्या ठिकाणी आपण पाणी सहज साठवून ठेऊ शकतो याची योजना करता येईल. आपल्या परिसरातील मातीची खोली आणि मातीचा प्रकार पाहून पाण्याची धारणक्षमता किती आहे हेदेखील अभ्यासले गेले पाहिजे. विशेष करून शेतकर्‍यांना याचे प्रशिक्षण देऊन कोणत्या परिसरात किती पाण्याची उपलब्धता आहे आणि कोणती पिके की उपलब्ध पाण्यावर उच्चांकी उत्पन्न देऊ शकतात याचा अभ्यासही महत्त्वाचा. पाणी सिंचनाच्या पारंपरिक सोयीसुविधांऐवजी आधुनिक तंत्राचा वापर हा नक्‍कीच पाणी बचतीस आधार देणारा ठरेल.

रत्नागिरीसारख्या कोकण किनारपट्टीनजीकच्या भौगोलिक परिसराचा विचार करता येथील दगड आणि माती यांचा स्थानिक भौगोलिक रचनेनुसार अभ्यास करूनच शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि दुरूस्ती होणे अत्यावश्यक आहे. नाहीतर, बांधला बंधारा आणि पाण्याऐवजी गाळ साठला अशी परिस्थिती असल्याचे दिसून येते. एकाच मोजपट्टीवरून निर्माण केल्या गेलेल्या योजना यशस्वी होत नाहीत. याचा मागील तेरा पंचवार्षिक योजनांमधील अपयशाचा अनुभव आपणा सर्वांनाच आहे.  

दगड, माती आणि पाणी यांचे एकमेकांशी असणारे सहसंबंध तपशीलवार अभ्यासूनच निर्णय घेणे उचित ठरेल. आपल्यासाठी पाणी या आवश्यकतेसोबतच भविष्यातील पिढीसाठी पाणी ही बाबही तितकीच महत्त्वाची आहे. जेवढा विचार पिण्यासाठीच्या शुद्ध पाण्याचा आहे, तेवढाच विचार अशुद्ध किंवा सांडपाण्याचाही व्हायला हवा. एक लिटर सांडपाणी हजारो लिटर वापरण्याजोग्या पाण्याची नासाडी करू शकते हे ध्यानात ठेवून अशा सांडपाण्याचा बंदोबस्त करणे जास्त गरजचे आहे. स्मार्ट सिटीची भाषा करणार्‍यांनी आधी स्वच्छतेचा आग्रह धरला पाहिजे.

मैला किंवा सांडपाणी सोडताना आपल्या आजुबाजूच्या परिसरातील दगड आणि माती यांचा अभ्यास तितकाच महत्त्वाचा. कारण, त्याचा विचार न करता सांडपाणी उघड्यावर सोडले जाते आणि हे पाणी आजारांचे कारण बनते. तर काहीवेळेस शोषखड्डे काढून जमिनीत सांडपाणी मुरवण्याच्या प्रयत्नात हे सांडपाणी स्वच्छ पाण्याच्या साठ्यात जाऊन ते पाणी दूषित होते. पाण्यासंदर्भातील सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा विचार करताना दगड, मातीचा विचारही तितकाच आवश्यक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

आपल्याला आवश्यकता असणार्‍या पाण्यासाठी शेकडो फूट खोल विंधनविहिरी निर्माण करणे सहज शक्य आहे पण यातून घटणारी भूजल पातळी आजुबाजूच्या संपूर्ण जैवविविधतेवरती घातक परिणाम दाखवते हे लक्षात ठेवूनच आपण आपले नियोजन ठेवले पाहिजे. जमीन, पाणी, दगड आणि माती यांचाही तितकाच विचार महत्त्वाचा आहे जितका मानव आणि मानवी जीवनाचा. 

निसर्गाकडे केलेले दुर्लक्ष संपूर्ण मानवी समाजाची माती करणारे ठरेल. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच निसर्गाचा विचार करून विकासाचे निर्णय घेऊयात. निसर्ग जोपर्यंत सुरक्षित आहे तोपर्यंतच आपण सर्व आहोत याचे भान कायम ठेवून पर्यावरण स्नेही होऊयात!