Mon, Apr 22, 2019 01:42होमपेज › Konkan › उत्सवप्रिय कोकणवासीय

उत्सवप्रिय कोकणवासीय

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 11 2018 10:56PM- विशाल मोरे, रत्नागिरी

कोकणी माणूस आणि सण यांचे नातं अगदी अतूट राहिलेलं आहे. प्रत्येक सण कोकणात मोठ्या उत्साहाने, भक्‍तीभावाने आणि विधिवत साजरा केला जातो. कोकणात दिवाळी, तुलशी विवाह, शिमगोत्सव, गणेशोत्सव, नारळी पोर्णिमा, स्थानिक जत्रौत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. यातील सर्वात मोठा आणि घरादाराचे रंगरूप बदलणारा एक आगळावेगळा सण म्हणजे गणेशोत्सव! गणेशोत्सव म्हटला की, कोकणातील कुणीही कुठेही व्यवसाय, नोकरीनिमित्त जगभरात असला तरीही तो या उत्सवासाठी घराकडे आल्याशिवाय राहत नाही. या उत्सव काळातील वातावरण भारलेले असते. या उत्सवाच्या निमित्तानेच कोकणी माणसांच्या मनाची श्रीमंतीही दिसते आणि उपजत असलेल्या अमाप उत्सवी स्वभावाचेही दर्शन होते.

कोकणातील गणेशोत्सव पाहिला तर तो भक्‍तीभावाने आदरपूर्वक साजरा केला जातो. लहानांपासून थोरामोठ्यांंमध्ये उत्साहाचे उधाण आणणारा सण म्हणून कोकणातील गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सव कालावधीत घराघरांत चैतन्याचे आणि मंगलमय वातावरण असते. गणेश पूजनाचे ठिकाण ठरलेले असते. किंबहुना घर बांधते वेळीच तशी सोय केलेली असते. बरेच गणपती हे घराण्याचे किंवा भावकीचे गणपती असतात. विभक्‍त कुटुंबे असली किंवा नोकरी-धांद्यानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाली असली तरीसुद्धा आपले मूळघर मानून सर्व गणेशोत्सवासाठी आपापल्यापरीने खर्च केला जातो. वर्गणी काढून किंवा आळीपाळीने प्रत्येक वर्षी गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. बाप्पाच्या सजावटीची, मूर्तीची, नैवेद्याची कमतरता भासू दिली जात नाही. गणपती पाहण्याचे निमंत्रण दिले जाते. वाड्या-वाड्यांतून आणि गावोगावी गणपती आणि त्यावेळी केलेली आरास पाहण्याचा कार्यक्रम सुरूच असतो. 

आजच्या बदलत्या स्थित्यंतरातही 2 हजार एस.टी. गाड्या मुंबईकरांना घेऊन कोकणात येत आहेत तर कोकण रेल्वेमार्गावर मुंबईतून कोकणात येणार्‍या अनेक जादा रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या खेरीज गावातील मुंबईस्थित आणि गावामध्ये राहणार्‍या अनेक कुटुंबांमध्ये चारचाकी गाड्या दारात उभ्या असलेल्या दिसतात. तर अनेकजण मुंबईतून गावी खास गाड्या भाड्याने घेऊन येतात आणि पाच दिवस, सात दिवस पूर्वीच्याच उत्साहाने गणपतीचा हा उत्सव आनंदी वातावरणात साजरा होतो. संगणकीय युगातही कोकणातील हा गणपती उत्सव कुटुंबातील काही नोकरी व्यवसायानिमित्त दूरवर राहणार्‍यांना एकत्र आणतो. सर्वसामान्य शेतकर्‍यापासून श्रीमंतीपर्यंत सर्वच जण श्रीगणेशाच्या आगमनाची प्रतीक्षा करून असतात. कितीही पाऊस असला, महागाई गगनाला भिडली तरीही कोकणातील माणूस गणपतीचा हा उत्सव थाटामाटातच साजरा करतो. प्रत्येक घरात, कुटुंबात गणेशमूर्तीचे होणारे पूजन बदलत्या काळातही पूर्वीच्याच भक्‍तीभावाने केले जाते. म्हणूनच गणेशोत्सवात मुंबईकर अत्यंत आपुलकीने, मायेने आणि गावच्या घराच्या ओढीने अनेक अडचणींवर मात करीत धाव घेतात आणि आनंदाने, उत्साहाने उत्सव साजरा करतात. कोकणात गणेशोत्सव काळात घरोघरी भजनांचे केलेले नियोजनही आत्मियतेचा भाग बनून आहे. प्रत्येकाच्या घरी अर्धा तास तरी भजन म्हटल्याशिवाय गणेशाचा उत्सव खर्‍या अर्थाने साजरा होत नसल्याची भावना इथल्या भाविकांची आहे. काही ठिकाणी डबलबारी, ट्वेंटी-ट्वेंटी भजनांचेही आयोजन केले जाते. याशिवाय या काळात देखाव्यांच्या निर्मितीतून सामाजिक प्रबोधन करीत संस्कृती टिकवण्यावर भर दिला जातो. महिलांचा फुगडी कार्यक्रमही गल्लोगल्लीत रंगलेला पहावयास मिळत असतो. गणेशोत्सवाच्या कालावधीत घराघरांत गोडधोड चविष्ट पदार्थांची निर्मिती सुरू असते. यामध्ये मोदक साधे व उकडीचे, लाडू, पातोळे म्हणजे उकडीच्या करंज्या आदींमुळे घराच्या गोडीला आणखी चवदार केले जाते. शिवाय पाच प्रकारच्या रानभाज्या करून खिरीसह नैवेद्य दाखविला जातो.

प्रत्येक घरात या काळात चैतन्याचे वातावरण असते. सर्वजण समरसतेने काम करतात. गणपतीची प्रतिष्ठापना केल्यावर खीर-मोदकांचे नैवेद्य, आरत्या, भजने असे कार्यक्रम सुरु होतात. सर्वजण गणरायाच्या सेवेत मग्न असतात. वाडी-वाडीत भजने होतात. सामुदायिक आरत्या होतात. अनंत चतुर्दशीपर्यंत मंगलमय वातावरण असते. गणेशमूर्तींचे विसर्जनही मोठ्या थाटामाटात केले जाते. 

चाकरमान्याच्या मनिऑर्डरवर अवलंबून असणारा कोकणचा हा मुलुख आज आर्थिकद‍ृष्टया सक्षमही आहे. ऋण काढून सण साजरा करणारा कोकणी माणूस मनाच्या श्रीमंतीने येणारे सणही तसेच उत्साहाने साजरा करतो. गणेशोत्सवाचा असा चैतन्याने भारलेला उत्साह कोकणाइतका अन्यत्र कुठेही नाही.