होमपेज › Konkan › प्रभाते मनी... : अंगणवाडी

प्रभाते मनी... : अंगणवाडी

Published On: Aug 26 2018 10:42PM | Last Updated: Aug 26 2018 10:27PMजाकीर शेकासन, आरवली

चिऊ, काऊ, माऊ यांची ओळख करून देणारे अंगण खर्‍या अर्थाने विस्तारतं ते अंगणवाडीतून. बालशिक्षण हा कोणत्याही मजबूत व्यवस्थेचा पाया असतो. केवळ शिक्षणच नव्हे तर मुलांचे बौद्धिक, मानसिक, सामाजिक, शारीरिक पोषण करणारी व्यवस्था म्हणजे अंगणवाडी असे अंगणवाडीबद्दल म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मुलं ही कोणत्याही राष्ट्राची संपत्ती. पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने देशातील खेडी मागासलेली असल्याने अशा खेडेगावामधील बालकांपर्यंत आहार आणि आरोग्यसेवा पोहोचविता यावी याकरिता बालकांसाठी सुरू असलेली ही योजना आहे. त्यामुळे बालकांची जडणघडण आणि त्यांचा विकास या उद्देशावर आधारित असे अंगणवाडीचे कार्य आहे. एकात्मिक बाल विकास योजनेच्या कार्यक्षेत्रात अगदी शेवटच्या परंतु महत्त्वाच्या पातळीवर काम करणार्‍यांमध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशासेविका, माध्यान्ह भोजन बनविणार्‍या महिला असा महिला कर्मचार्‍यांचा सहभाग या योजनेंतर्गत आहे. एकात्मिक बाल किकास योजनेंतर्गत भोजन, शाळापूर्व प्रशिक्षण, गर्भवती माता, आई व बाळाला पहिल्या सहा वर्षांपर्यंत प्राथमिक आरोग्यसेवा, पोषक आहाराचे, गोळ्यांचे वितरण, प्राथमिक आरोग्याची माहिती देणे आणि पडताळणी, लसीकरणाच्या कामात सहकार्य इत्यादी महत्त्वपूर्ण कामे या महिला करतात. यातील अंगणवाडी योजनेतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे काम महत्त्वाचे ठरते.

यातील काही सेवा या प्रत्यक्ष अंगणवाडीमध्ये मुलांना दिल्या जातात तर काही सेवा या घरभेटीतून दिल्या जातात. मात्र, अंगणवाडीत फक्त तीन वर्षांपुढची मुले येऊ शकतात. तीन ते सहा गटातील मुलांना योजनेचा थोडाफार लाभ मिळतो. विशेषतः अतिकुपोषित मुलांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते असे दिसते. बालकांच्या मानसिक विकासाचा व वाढीचा पाया भक्कम करणे, 0-6 वर्षे वयोगटातील मुलांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा, बालकांमधले मृत्यू, आजार, कुपोषण कमी करणे आणि यामुळे होणारी शैक्षणिक गळती थांबविणे, आई आणि कुटुंबाचे बालसंगोपनाचे कौशल्य वाढविणे, यासाठी निरनिराळ्या विभागांचे सहकार्य घडवून आणणे ही अंगणवाडी योजनेची काही महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.

ग्रामीण भागातील अंगणवाड्या वैशिष्ट्यपूर्णच म्हणाव्या लागतील. अंगणवाडी सेविकांच्या सातत्यपूर्ण मेहनतीने इथली मुले शाळापूर्व शिक्षण अगदी व्यवस्थितपणे घेत आहेत. मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अनुकूल असे साहित्य इथे पहायला मिळते. मुळाक्षरं, रोजच्या दिनक्रमाचे नियोजन, फळं-फुलांची नावे, कविता, अंक यांचे तक्ते पहायला मिळतात. या तक्त्यांच्या आधारे सेविका मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देतात. कापडाचे पॅचवर्क केलेली कलाकुसर, वेगवेगळी उपयोगी चित्रं हे सगळे रंगकाम या सेविकांकडून केले जाते. अंगणवाडीत मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक, सामाजिक विकासाकडेही लक्ष दिले जाते.

मुलांचा सर्व प्रकारे विकास व्हावा यासाठी अंगणवाडीत प्रयत्न केला जातो. इथे मुलांना प्रात्यक्षिकातूनच जास्तीत जास्त गोष्टी समजावण्याकडे कल असतो. मुलांचे योग्य संगोपन व्हावे यासाठी नोकरीपेक्षाही अधिक कर्तव्य अंगणवाडीसेविका पार पाडतात. त्यामुळे या मुलांनाही सेविकांचा लळा लागतो आणि अगदी मुक्तपणे ही मुले इथे रमतात, त्यांचा आत्मविश्‍वास वाढतो. हेच मुलांचे सर्वांगिण पोषण आहे.

एकात्मिक बाल विकास सेवांंतर्गत या अंगणवाडींना 1975 मध्ये सुरुवात झाली. बालकांमधील कुपोषणाशी लढणे हाच अंगणवाडी प्रकल्प सुरू करण्याचा मुख्य उद्देश होता. या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी हे सर्क आरोग्य, पोषण आणि शिक्षणविषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहे. बालकांच्या विकासाची एक नावीन्यपूर्ण योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जाते. मात्र, अंगणवाडीसाठी निवडलेला मुख्य वयोगट हा तीन ते सहा असा आहे. त्यामुळे तीनपेक्षा कमी वयाची मुले कुपोषण योजनेच्या दृष्टीने दुर्लक्षित राहतात. कुपोषण व आजारांचे प्रमाण याच वयोगटात जास्त दिसून येते. अंगणवाडी योजनेची ही एक मोठी त्रुटी आहे.

अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पोषण आहार व कुपोषणाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मोठी मदत होत असताना त्यांच्या मूलभूत प्रश्‍नांकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अंगणवाडी सेविकांचे प्रश्‍न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. याबाबत सकारात्मक विचार व्हायला हवा. ज्या लहान मुलांचे आरोग्य, शिक्षण सुधारण्याचे काम ज्यांच्या हाती आहे, त्यांच्याकडेच दुर्लक्ष करणे चुकीचे वाटते. अलीकडच्या काळात अंगणवाड्यांना खासगी ‘प्ले स्कूल’चे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे काळाची आव्हाने अंगणवाडी सेविकांना पेलावी लागणार आहेत.