Thu, Jul 18, 2019 02:05होमपेज › Konkan › प्रभाते मनी : नाती टिकविताना...

प्रभाते मनी : नाती टिकविताना...

Published On: Jul 29 2018 11:13PM | Last Updated: Jul 29 2018 10:50PMप्रमोद करंडे, रत्नागिरी

एखाद्या गोष्टीवरची नि:संशय श्रद्धा म्हणजे विश्‍वास. भविष्यातील कृतीच्या संदर्भात एका व्यक्‍तीने दुसर्‍या व्यक्‍तीवर ठेवलेल्या श्रद्धेला ‘विश्‍वास’ असे नाव आहे आणि सामाजिक जीवनासह वैयक्‍तिक जीवनातही विश्‍वासाला महत्त्वाचे स्थान आहे. विश्‍वास ठेवणार्‍यांची आणि तो टिकविणार्‍यांचीही संख्या मोठी असल्याने विश्‍वासाचे मूल्य बळकट होत गेले. विश्‍वास ठेवल्याखेरीज आणि तो टिकविल्याखेरीज कोणतेही नातेसुद्धा पुढे जात नाही. प्रश्‍न आहे तो ज्यांच्यावर आपण विश्‍वास टाकतो, त्यांनी तो टिकवण्याचा. विश्‍वास शब्दांतून नव्हे तर कृतीतून कमवावा लागतो. सूर्य रोज उगवेल हा विश्‍वास जसा दुर्दम्य आहे, तसाच विश्‍वास नवनवीन शोधांवर मानवजातीने ठेवला म्हणून जग इथवर आले आणि मानवी जगणे पूर्वीपेक्षा अधिक सुखकर झाले. 

काही कामानिमित्त म्हणा किंवा सहज आठवण आली म्हणून म्हणा, फोन केला आणि तो बिझी लागला. आपला कॉल आलेला पाहून, नंतर जर त्याने स्वतःहून कॉल केला तर ती व्यक्‍ती आपली कदर करते हे लक्षात येतं. पण काही कारणाने नाहीच जमलं त्या व्यक्‍तीस आपल्याला कॉल करणं आणि म्हणून पुन्हा थोड्या वेळाने आपण फोन केला आणि त्याने तो उचलला तर आपण सहज विचारून जातो, मघाशी पण फोन केला होता. पण बिझी लागला. व्यक्‍ती अगदीच जवळची असेल तर मग, कोणाशी बोलणं चालू होतं? असंही विचारतो कदाचित. तसेच घरी पोहोचताच फोन अथवा मेसेज कर, असे आपण बोलून जातो. आता या वाक्यांतून कोणाला ती काळजी वाटेल तर काहींना संशय.

वरील दोन्ही वाक्यात आपल्या हाती पुरावा असा काही नाही. त्यामुळे तो संशय की काळजी हे प्रसंगानुरूप ठरू शकेल. केवळ वाचण्याचा स्वर बदलला की अर्थ बदलतो. म्हणजे ज्या वाक्यांचा आधी इतकी काळजी करणारा कोणी असेल का? असा अर्थ काढला जात असेल, तो आता सरळ विश्‍वास नव्हता, म्हणून असे विचारत होता असा बनतो. काळजी ते अविश्‍वास हा प्रवास, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे, शंकेमुळे झाला की संशयाने हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. संशयाने झाला असेल तर ती विचारणार्‍याची चूक आणि शंकेने झाला असेल तर निष्कर्ष काढणार्‍याची. शंकेचे निरसनच असे करावे की पुढे शंका घेण्यास जागा राहू नये. संशयास मात्र अंत नसतो. त्यामुळे शंकेमुळे झालेला हा प्रवास हेच सिद्ध करतो की, निष्कर्ष काढणारा, विचारणार्‍याच्या शंकेचे निरसन करण्यात अपयशी ठरला.

‘संशयाने शंका, शंकेने संशय’ अशा दुष्ट चक्रात अडकणे वाईटच! अगदी चकवा मागे लागल्यागत अवस्था! त्यामुळे, शंका निर्माण झाली तर त्याचे योग्य निरसन हाच एकमात्र उपाय आहे. असा उपाय करत असताना प्रसंगी आपला अहंकार, बडेजाव आदी गोष्टी बाजूला सारून व्यक्‍तीला अथवा व्यक्‍तीसोबतच्या आपल्या नात्याला महत्त्व द्यावे. नात्यासाठी कमीपणा घेणे अथवा सरळ नात्याला शरण जाणे हे परमेश्‍वराला शरण जाण्याइतकेच महत्त्वाचे आहे आणि कोणत्याही परिस्थितीत नातं  टिकवणं हीच नात्याची खरी कदर असते.

नात्यांमध्ये दोघांचे सूर मिळाले तर ‘सूर बने हमारा’, असे मधूर सरगम  वाजतील. नाहीतर मग फटाकेच वाजतात. नात्यातले नियम अलिखित  असावेत. अंतः करणापासून, मनापासून जपावीत नाती, म्हणजे ती फुलतात अणि बहरतात. गणित हे व्यवहारापुरतेच मर्यादित असावे. कुठल्याही नात्यामध्ये गणितच नसावे. मग ते पतीपत्नीचे, माय लेकराचे, पितापुत्राचे, सासूसुनांचे, मित्रमैत्रिणींचे. कुठलेही नाते घ्या. त्यात असावे फक्‍त प्रेम. प्रेम या एका संकल्पनेवर माणूस आयुष्य तरून जातो. प्रेम अणि त्याग या भावना ज्याला समजतात तो खरा कुबेर. 

सर्वच गोष्टी सगळ्यांना कशा जमतील? प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्ये असते, स्वत:ची एक पद्धत असते. दोन व्यक्‍ती एकत्र आल्या की दोघांनाही थोडे बदलावे  लागते. एकमेकांच्या  भावना  जपण्यासाठी हे आवश्यक  असते. मी असाच आहे, किंवा मी अशीच आहे, मला असेच आवडतेे, मी असेच जगणार... या ‘मी’ ला वेळीच दूर करायला पाहिजे. काही वाद असतील, विवाद असतील तर एकमेकासमोर मांडायला हवेत. एकमेकांवरचा विश्‍वास, प्रेम या गोष्टी नात्यात महत्त्वपूर्ण ठरतात. दोन मने, दोन मेंदू एकत्र येऊन लवकर प्रश्‍न सुटतात. मने मोकळी झाल्यावर मेंदू पण शरण येतो.

अलीकडे घरातल्या व्यक्‍तींमध्ये संवाद राहिलेला नाही. काळाच्या ओघात सोयीसाठी एकत्र कुटुंबपद्धती संपणं अपरिहार्य होतं, पण कुटुंब छोटं झालं आणि एकमेकांचा संवादच तुटला. विसंवाद नव्हे, तर संवाद टाळला जाऊ लागला. सगळ्यात जास्त गरज आहे ती संवादाची! प्रत्येक कुटुंबाने दिवसातील एका ठराविक वेळी तरी एकत्रितपणे बोलायला हवं. तिथे प्रत्येकाचे विचार ऐकले जावेत, वडीलधार्‍यांनी लहानांची मते समजून घ्यावीत, आपलं चुकत असेल तर चुकी कबुल करून त्याप्रमाणे स्वत:तही बदल करावा आणि दुसर्‍यांनी कसे वागावे, यापेक्षा स्वत: दुस-याला हवे तसे वागावे. एकमेकांशी संवाद साधल्याने बरेचसे प्रश्‍न कमी होतील.. किंवा सुटतील तरी..!