Thu, Mar 21, 2019 11:45होमपेज › Konkan › कोकणची बुद्धिमत्ता झिरपतेय कोठे?

कोकणची बुद्धिमत्ता झिरपतेय कोठे?

Published On: Jun 01 2018 11:01PM | Last Updated: Jun 01 2018 10:37PMसमीर जाधव, चिपळून

बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. सलग सातव्या वर्षी कोकण बोर्डाने राज्यामध्ये निकालात पहिला नंबर काढला. यातून कोकणची पोरं हुश्शार हे सिद्ध झाले. मात्र, ही बुद्धिमत्ता नेमकी कुठे झिरपतेय? हा प्रश्‍न आहे.

विकासाच्या बाबतीत कोकण इतर भागांच्या तुलनेत मागे आहे, हे आज कुणीही नाकारणार नाही. त्यामुळे सर्वात शेवटी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला मुहूर्त मिळाला. कोकण ही भूमी विदर्भ, मराठवाड्याची मावशी आहे, असे म्हणतात. कारण त्या ठिकाणी कायम दुष्काळ असतो. दुसर्‍या बाजूला कोकणातदेखील हवामानामुळे सातत्याने संकटे येत असतात. येथील बुद्धिमत्ता अनेक वर्षे झाकोळलेली होती. भारतरत्न रत्नागिरी जिल्ह्यातूनच निपजले. परंतु या बुद्धिमत्तेला कौतुकाची थाप मिळाली नाही. कोकण बोर्डाच्या स्थापनेनंतर राज्यातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत कोकणातील मुले सरस आहेत हे सिद्ध झाले. याशिवाय ‘कॉपीमुक्‍त’ परीक्षेमध्येही कोकणाचाच नंबर लागला. या उलट एकेकाळी राज्यात आघाडीवर असलेला ‘लातूर पॅटर्न’ आता रसातळाला गेला आहे. कोकणातील मुलांनी आपली बुद्धिमत्ता सिद्ध करून तथाकथित लातूर पॅटर्नला छेद दिला. ही कोकणची हुशारी आहे.

दहावी, बारावीपर्यंत असणारी ही हुशारी पुढे कुठे जाते? हा प्रश्‍न आहे. कोकणच्या विकासात या बुद्धिमत्तेतील योगदान फारसे दिसत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. पूर्व परंपरेनुसार येथे शिकणारा माणूस बाहेर जातो. अगदी परदेशात जाऊन मोठा होतो. ही परंपरा आजही सुरुच आहे. त्यामुळे कोकण आहे तसेच आहे.  प्रशासकीय सेवेमध्ये अनेक वर्षांनंतर चिपळूणची अश्‍विनी जोशी जिल्हाधिकारी झाली. त्यानंतर अन्य कुणीही असा झेंडा रोवलेला नाही. कोकणातील अनेक लोक मोठमोठ्या पदांवर गेले. मात्र, कोकणच्या विकासासाठी त्यांनी मागे वळून पाहिले नाही, ही खंत आहे. दरवर्षी दहावी, बारावीमध्ये हजारो मुले उत्तीर्ण होतात. वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रवेश घेऊन पुढील शिक्षण घेतात. अगदी डॉक्टर, इंजिनियर, वकील, आयआयटी अशा ठिकाणी जातात. शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वत:च्या पायावर उभे राहतात. यामध्ये कोकणातून परदेशी जाणार्‍या मुलांची संख्यादेखील मोठी आहे. अमेरिका, दक्षिण आफ्रिका, अरब राष्ट्रांमध्ये अनेक कोकणी मुले कार्यरत आहेत. त्यामुळे येथील बुद्धिमत्तेचा अन्य भागातील लोक पुरेपूर वापर करुन घेतात. 

कोकणात कृषी विद्यापीठ आहे. मात्र, कोकणी बुद्धिमत्तेला त्याचा उपयोग होत नाही, हे दुर्भाग्य आहे. या विद्यापीठात बहुतांश विद्यार्थी अन्य विभागातून आलेले असतात. ते येथे शिक्षण घेऊन आपल्या विभागात जाऊन मातीत काम करतात. मात्र, कोकणी माणूस आपली माती सोडून बाहेरगावी जातो. तेथे आपले टॅलेंट वापरतो आणि जी अर्थप्राप्‍ती होईल त्यातून एखाद्या शहरात स्थिरावतो. त्यामुळे कोकण आहे तसेच आहे.

कोकणातील विद्यार्थ्यांना करिअरबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. दहावी, बारावीनंतर विज्ञान, कला, वाणिज्य या पलीकडे करिअर करण्याच्या संधी असतात याची कल्पनाच येथील मुलांना नाही. किंबहुना येथील राजकारणीही त्यासाठी पुढाकार घेत नाहीत. करिअर मार्गदर्शन मेळावे, चर्चासत्र, समुपदेशन अशाप्रकारचे उपक्रम स्थानिक राजकीय पुढारी कधी घेत नाहीत. ते केवळ संघटना वाढीसाठी अशा तरूणांचा उपयोग करतात. त्यामुळे येथील मुलांना यशाचा मार्ग सापडत नाही. कौशल्य, बुद्धिमत्ता व क्षमता असूनही मुले पदवीपर्यंत शिक्षण घेऊन नोकरीअभावी अखेर मुंबई, पुण्याची वाट धरतात किंवा गावातच अडखळत नोकरीच्या शोधार्थ राहतात. येथील बुद्धिमत्तेला योग्य वाव देण्यासाठी अशा करिअर विषयक मार्गदर्शनाची खरी गरज आहे. तरच येथील बुद्धीचा कस लागेल...!