Wed, Jan 22, 2020 02:28होमपेज › Konkan › प्रदूषणकारी कारखान्यांची झाडाझडती

प्रदूषणकारी कारखान्यांची झाडाझडती

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 18 2018 9:47PMखेड : प्रतिनिधी

लोटे येथील प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने येथील एका पर्यावरणप्रेमीने केंद्रीय समितीकडे तक्रार केली. त्यानुसार दि. 18 एप्रिल रोजी गुजरात येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक लोटे औद्योगिकमध्ये दाखल होत कारखान्यांची झाडाझडती घेतली. त्याचा अहवाल केंद्रीय समितीला येत्या पंधरा दिवसांत सादर करण्यात येणार आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतून होणार्‍या प्रदूषणाबाबत आता थेट केंद्रीय पर्यावरण खात्याने दखल घेत अहवाल मागवला असून हे पथक पंधरा दिवसांमध्ये पाहणीचा अहवाल पर्यावरण मंत्रालयाला सादर करणार आहे. त्यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीत केवळ नफ्याची गणिते मांडत पर्यावरणाचे तीन तेरा वाजवणार्‍या कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत. 

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रासायनिक औद्योगिक वसाहतींमधील एक असलेल्या खेडमधील लोटे औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांकडून होत असलेल्या पर्यावरणविषयक नियमांच्या उल्लंघनामुळे प्रदूषणाचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. येथील वायू, जल व भूमी प्रदूषणासंदर्भात सातत्याने ओरड होत असून अनेक वेळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारीदेखील झाल्या. परंतु, उद्योजकांवर कोणत्याही प्रकारे कठोर कारवाई न करता त्यांना सतत सवलत देण्यातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ गुंतल्याचे दिसते आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणकारी कारखान्यांबाबत खेड येथून दि. 18 ऑगस्ट 2017 रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या केंद्रीय विभागाने दि. 23 ऑगस्ट 2017 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पुढील कारवाईसाठी तक्रार वर्ग केली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण येथील कार्यालयातील अधिकारी या तक्रारीच्या अनुषंगाने पाहणी करण्यासाठी दि. 21 सप्टेंबर 2017 रोजी लोटे औद्योगिक वसाहतीत गेले. मात्र, तक्रारदार यांना त्यांनी केलेल्या पाहणी अहवाल व पुढील कारवाईबाबत कोणतीच माहिती त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या चिपळूण कार्यालयाकडून देण्यात आली नाही. 

लोटेतील प्रदूषणकारी कारखान्यांबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून कारवाई होईल या प्रतीक्षेत संबंधित तक्रारदार यांनी तब्बल तीन महिने वाट पाहिली. अखेर कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी दि. 3 जानेवारी 2018 रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे याबाबत सविस्तर तक्रार ई-मेलद्वारे केली. त्यामध्ये स्थानिक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कंपनी विरोधात सुयोग्य अहवाल देत नसल्याने तज्ज्ञांमार्फत चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तक्रारीची दखल घेऊन दि. 27 फेब्रुवारी रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ वडोदरा गुजरात विभागीय 
कार्यालयातील सहाय्यक संचालक  गुरम सिंग यांना विशेष बाब म्हणून चौकशी करून याबाबतचा विस्तृत अहवाल पंधरा दिवसांत सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गुजरात विभागीय कार्यालयातून वैज्ञानिक  अरविंद झा यांच्या नेतृत्वाखाली एक पथक लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणकारी कारखान्यांच्या तपासणीसाठी बुधवार दि. 18 एप्रिल रोजी दाखल झाले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक लोटे औद्योगिक वसाहतीत आल्यानंतर त्यांनी  कारखान्यांची अंतरबाह्य तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल सदरचे पथक वडोदरा गुजरात येथे पोहोचल्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे सादर करणार असल्याचे एका कर्मचार्‍याने सांगितले. 

कारवाईची अपेक्षा
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कोणताही अंकुश प्रदूषणकारी कारखानदारांवर राहिलेला नाही. त्यामुळेे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कठोर कारवाई करून येथील पर्यावरण वाचवण्याचे काम होईल, अशी अपेक्षा याप्रकरणी तक्रार दाखल केलेले खेड येथील सामाजिक कार्यकर्ते सैफ चौगुले यांनी व्यक्‍त केली आहे.