Tue, Jul 23, 2019 02:25होमपेज › Konkan › कुत्र्यांच्या हल्ल्याने गमावलं पण पोलिसांनी वाचवलं!

कुत्र्यांच्या हल्ल्याने गमावलं पण पोलिसांनी वाचवलं!

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 11:03PMकुडाळ : वार्ताहर

कुडाळ शहरात काल रात्री एक घटना घडली. सुमारे सव्वा दोन लाख रु. किंमतीचे दागिने असलेली बॅग कुत्र्यांच्या झालेल्या अचानक हल्ल्यांमुळे रत्नागिरी येथे राहणार्‍या सचिन अशोक रसाळ यांना गमवावी लागली, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती पुन्हा सापडली. रसाळ हे भूमीअभिलेख खात्यामध्ये अधिकारी असून ते रात्री उशीर झाल्यामुळे कुडाळ शहरात थांबले होते. त्यावेळी  भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्‍ला केल्यामुळे ही घटना घडली. 

सचिन रसाळ हे रत्नागिरी येथून कसालपर्यंत रविवारी सायंकाळी 4 वा. एसटीने प्रवास करत होते. यादरम्यान ते कसालला न उतरता मालवण येथे उतरले. यानंतर रात्री उशिरा ते मालवण येथून कुडाळ येथे आले. बराच उशिर झाल्याने ते रात्री कुडाळ शहरातील महालक्ष्मी मंदिर नजीकच्या एका कॉम्प्लेक्सकडे झोपले.यावेळी त्यांच्याकडे एक सुटकेस व अन्य दोन पिशव्या होत्या. मध्यरात्री शहरातील भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या कुत्र्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी बॅगा तिथेच टाकून पळ काढला. नंतर ते त्या भागात गेले नाहीत. तो वर महिला पोलिस उपनिरिक्षक जी.जी.पाटील यांच्यासह पोलिसांचे एक पथक रात्री शहरात गस्त घालत होते. गस्त घालताना या बेवारस बॅगा त्यांच्या नजरेस पडल्या. पोलिस उपनिरिक्षक पाटील यांच्या समवेत असलेल्या श्री. सावंत, श्री. साबळे यांच्या यांनी त्या बॅगा कोणाच्या आहेत यासाठी शहरात शोधमोहिम हाती घेतली पण कोणीही सापडले नाही. नंतर त्या बॅगा पोलिस स्थानकात आणल्या. त्या तपासल्या तेव्हा त्यात सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या दोन बांगडया, अंगठी, कानातील रिंग व मोबाईल सापडला. 

रसाळ यांच्या लक्षात आले की, आपल्या बॅगा जाग्यावर नाहीत. त्यामुळे ते सकाळी कुडाळ पोलिस स्थानकात तक्रार देण्यासाठी आले. पोलिसांनी त्यांची बॅगच त्यांच्यासमोर ठेवली. किंमती दागिने असलेली बॅग पाहताच त्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना बॅग सापडली. या घटनेची चर्चा दिवसभर कुडाळ शहरात होत होती.