Sat, Jul 20, 2019 10:42होमपेज › Konkan › लाचखोर पोलिसाला रंगेहाथ पकडले

लाचखोर पोलिसाला रंगेहाथ पकडले

Published On: Jul 26 2018 1:34AM | Last Updated: Jul 25 2018 10:27PMशृंगारतळी : वार्ताहर

आपल्या मुलाविरुद्ध आलेल्या तक्रारीमध्ये त्याला अटक करू नये आणि कोठडीत ठेवू नये, यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेताना रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी एका पोलिस कर्मचार्‍यालाच रंगेहाथ पकडले आहे. या प्रकाराने जिल्हा पोलिस वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसनाईक सुरेश लक्ष्मण गोरे याच्यावर ही कारवाई झाली.

ही कारवाई 25 जुलै रोजी सकाळी करण्यात आली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुहागर पोलिस ठाण्यातील  पोलिस नाईक गोरे यांच्याकडे एक तक्रार 
आली होती. यामध्ये एका तरूणाने दुचाकीचा हॉर्न वाजवत तरूणीचा पाठलाग केल्याची ती तक्रार होती. या तक्रारीनुसार, आपल्या मुलाला अटक करू नये, यासाठी पोलिस नाईक गोरे यांनी मुलाच्या वडिलांकडे दहा हजार रूपयांची लाच मागितली. यानंतर याबाबत संबंधित पालकाने ही माहिती रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. 24 जुलै रोजी ही रक्‍कम मागितली होती. त्या नुसार दहा हजारऐवजी नऊ हजारांवर तोडगा काढण्यात आला. त्यातील सहा हजारांचा पहिला हप्‍ता दि. 25 रोजी देण्याचे ठरले.  या माहितीवरुन लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिकार्‍यांनी सापळा रचला. 

ठरल्याप्रमाणे, 25 रोजी सकाळी संबंधित पालक पहिला सहा हजारांचा हप्‍ता देण्यासाठी पोलिस ठाण्याजवळील गणेश मंदिराजवळ आले व त्या ठिकाणी गोरे याला सहा हजार रूपये देण्यात आले. यानंतर संबंधित व्यक्‍ती व गोरे हे गुहागर पोलिस ठाण्यात आले. याच ठिकाणी गोरेला रंगेहाथ पकडले.  

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर व पोलिस हवालदार संतोष कोळेकर, संदीप ओगले, पोलिस नाईक विशाल नलावडे, पोलिस शिपाई सूरज राणे यांच्या पथकाने केली.