होमपेज › Konkan › बस दरीत कोसळून ३३ जण ठार

बस दरीत कोसळून ३३ जण ठार

Published On: Jul 28 2018 11:01PM | Last Updated: Jul 28 2018 10:35PMपोलादपूर/ महाबळेश्‍वर : प्रतिनिधी

पोलादपूर - महाबळेश्‍वर राज्य मार्गावर अंबेनळी घाटात दाभिलटोक येथे सकाळी 10.45 च्या सुमारास कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांच्या सहलीची बस 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 33 जण जागीच ठार झाले, तर सुदैवाने प्रकाश सावंत-देसाई हे कर्मचारी गाडीतून उडी मारल्यामुळे बचावले. या अपघातामुळे अंबेनळी घाटात मृत्यूचे तांडव निर्माण झाले होते. अपघातातील मृत हे 30 ते 40 वयोगटातील असून, कर्ते पुरुषच गेल्यामुळे 33 कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या भीषण अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की, भरधाव बस खोल दरीत कोसळल्याने बसचा अक्षरश: चुराडा झाला होता. खाली पडलेल्या बसचे तीन भाग झाले. सर्व मृतदेह दरीतून ट्रेकर्सच्या सहाय्याने सायंकाळी चारपर्यंत बाहेर काढण्यात यश आले होते. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात सर्व मृतदेह आणण्यात आले. नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या अपघाताची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन मृतांबद्दल सहवेदना व्यक्त करत आर्थिक सहाय्याची ग्वाही दिली आहे.

33 मृतांमध्ये अनुक्रमे हेमंत बापू सुर्वे (रा. के. व्ही. के. कॉलनी, कुळसणी, देवरुख), विक्रांत शिंदे (रा. दापोली), राजेश एस. सावंत (रा. जिववणे, बौद्धवाडी), एस. ए. गुजर (रा. वणन, दापोली) डी. जी. धायगुडे (रा. दापोली, के. व्ही. के. कॉटर्स), पंकज रामचंद्र कदम (रा. जळगाव, बांगारवाडी), संदीप वसंत झगडे (रा. गिमवणे, तेलेवाडी), संतोष मारुती झगडे (रा. गिमवणे, तेलेवाडी),
रवीकिरण प्रकाश साळवी (रा. दापोली, वडाचा कोंड), संदीप विठ्ठल सुर्वे (रा. दापोली), स्वप्निल सुधाकर देसाई (रा. जळगाव, ता. दापोली), अनिल ज्ञानदेव सावके (रा. गिमवणे, बुलढाणा), विनायक र. सावंत, संतोष म. पवार, महेंद्र ह. कोरडे, सचिन चंद्रकांत झगडे (रा. गिमवणे), सुयश विनायक बाळ (रा. लाडघर), संतोष शंकर जळगावकर (रा. दापोली), रोशन तबीब (रा. हर्णे, दापोली),  एस. के. शिंदे, आर. एम. बागडे (रा. चंद्रनगर), प्रमोद मोहन शिगवण (रा. दापोली, वडाचा कोंड), संदीप द. भोसले (रा. दापोली, बाजारपेठ), नीलेश तांबे (रा. चंद्रनगर), सचिन मोतीराम गिमवणेकर (रा. गिमवणे, दापोली), राजेंद्र विठ्ठल बडबे (रा. जळगाव), सुनील सीताराम राठले (रा. संगमेश्‍वर), प्रमोद र. जाधव (रा. मंडणगड), सुनील देहू कदम (रा. दापोली), जयंत हरिश्‍चंद्र चौगले (रा. दापोली), राजेंद्र आर.सिडबूड (रा. दापोली), संजय सावंत यांचा समावेश आहे.

धुक्यामुळे दुर्घटना

धुक्यामुळे चालकाला पुढील रस्ता न दिसल्याने तसेच अरुंद रस्ता असल्यामुळे बस डाव्या बाजूला असलेल्या दरीत सुमारे 800 फूट कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. बसमध्ये एकूण 34 प्रवासी होते. त्यातील केवळ एक वाचला आहे. ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या म्हणीप्रमाणे प्रकाश सावंत - देसाई यांनी प्रसंगावधान राखून गाडीबाहेर उडी मारल्याने ते बचावले. मात्र, सहलीच्या आनंदात असल्याने बाकीच्यांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.

नशीब व देवाची कृपा झाल्याने उडी मारल्याने मी दरीत पडता पडता वाचलो. मात्र, बसमधील माझे सहकारी दरीत कोसळल्याची पहिली माहिती प्रकाश सावंत-देसाई यांनी कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक संजय भावे यांना दूरध्वनीवरून दिली. त्यानंतर विद्यापीठाची टीमही पोलादपूरला दाखल झाली. अपघाताचे वृत्त समजताच महाड, पोलादपूरवरून मदतीसाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते अपघातस्थळी रवाना झाले. आ. भरत गोगावले यांच्यासह शिवसेनेची टीमही येथे दाखल झाली होती. त्याचबरोबर पोलादपूर, महाड, माणगाव येथील सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांची टीम अपघातस्थळी मदतकार्यासाठी आली होती. सर्व नातेवाईकांना पोलादपूर येथे ठेवण्यात आले हेाते. जवळजवळ 500 चा जनसमुदाय येथे आक्रोश करत होता.

महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कृषी विद्यापीठाचे कर्मचारी दापोलीहून महाबळेश्‍वरला सहलीसाठी निघाले होते. सकाळी 6.30 वाजता ही मंडळी दापोलीहून रवाना झाली. दरवर्षी भाताची लावणी झाल्यानंतर कृषी विद्यापीठातील कर्मचारी सहलीला जातात. त्याप्रमाणे हे कर्मचारी शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास दापोलीहून महाळेश्‍वरला जाण्यासाठी निघाले. परंतु, साडेदहा वाजता कर्मचार्‍यांची बस दरीत कोसळल्याने या सर्वांची जीवनाची दुर्दैवी अखेर झाली. 

बस अपघाताची माहिती मिळताच सर्व यंत्रणा आणि महाबळेश्‍वर ट्रेकर्स ग्रुप कर्मचार्‍यांच्या बचावासाठी पोलादपूरला रवाना झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. या घटनेसाठी 10 रुग्ण वाहिका ठेवण्यात आल्या असून महाड पोलादपूरसह महाबळेश्‍वरचे ट्रेकर्स खोल दरीत उतरून मृत्यू झालेल्या प्रवाशांना वर काढण्याचे कार्य करीत आहेत. बचाव कार्यामध्ये धुक्याचे अडथळे येत होते. या अपघाताने दापोली कृषी विद्यापीठावर शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये सिंधुदुर्गातील दोघे कासार्डेतील युवक ठार

कासार्डे/नांदगाव  : वार्ताहर

अंबेनळी घाटात बस कोसळून झालेल्या अपघातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे-उत्तर गावठाण येथील व फोंडाघाट कृषी संशोधन केंद्रात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असणारे विनायक रमेश सावंत (28) यांचा मृत्यू झाला. यामुळे कासार्डे गावावर शोककळा पसरली आहे. मुंबईत शिक्षण  झालेले विनायक सावंत हे गतवर्षीच दापोली येथील कृषी विद्यापीठात लिपिक म्हणून  नोकरीला लागले होते. यावर्षी त्यांची कणकवली तालुक्यातील फोंडाघाट कृषी संशोधन केंद्रामध्ये बदली झाली होती.  ते दररोज कासार्डे ते फोंडाघाट मोटारसायकलने  ये जा करत असत.  आई आणि भावासोबत ते कासार्डे  उत्तर गावठण येथे राहत असत तर  त्यांचे वडील मुंबई येथेनोकरीनिमित्ताने असतात. मनमिळावू स्वभावामुळे ते मित्रपरिवारामध्ये अतिशय प्रिय होते.त्यांच्याविषयी माहिती सांगताना मित्रांना अश्रू आवरता आले नाही.  शुक्रवारी संध्याकाळी ते कणकवली रेल्वे स्थानकातून रेल्वेने खेडकडे रवाना होवून या सहलीत सामील झाले होते.

सहलीला जाण्यापूर्वी त्यांच्या मित्राने न जाण्याचा आग्रह केला होता. मात्र ,आपण पैसे आधीच भरले असल्याने आपल्याला जावे लागले, असे सांगून तो मित्राचा निरोप घेऊन निघाला. मात्र, काळाचा अघात झाल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला.त्याच्या पश्‍चात वडील,आई,भाऊ असा परिवार असून त्यांच्या अपघाती निधनाने सावंत कुटुंबीयासह कासार्डे गावावर शोककळा पसरली आहे.हळहळ व्यक्त केली जात आहे. 

वेंगुर्लेतील एकाचा समावेश

वेंगुर्ले : वार्ताहर

महाबळेश्‍वर-पोलादपूर रस्त्यावरील अंबेनळी घाटातील भीषण अपघातात वेंगुर्लेचे  राजाराम गावडे यांचा व वेंगुर्लेचे जावई राजेंद्र रिसबुड या दोघांचा दुर्देवी अंत झाला. या घटनेने वेंगुर्लेवर शोककळा पसरली आहे.  या दुर्घटनेत वेंगुर्ले महाजनवाडी येथील मूळचे रहिवासी असलेले व बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे कार्यरत असलेले 

राजाराम उर्फ ज्ञानू गावडे (40) व वेंगुर्ले रामेश्‍वर मंदिर नजीकचे निवृत्त शिक्षक मोरेश्‍वर उर्फ भाई वैद्य यांचे जावई  राजेंद्र रिसबुड(दापोली) यांचा या भीषण अपघातातील मृतांमध्ये समावेश आहे.राजाराम गावडे यांनी वेंगुर्लेत प्रतिकूल परिस्थितीत वेंगुर्ले शाळा नंबर 3,वेंगुर्ला हायस्कूल व खर्डेकर महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले.

गावडे यांच्या पश्यात पत्नी,मुलगा,आई,भाऊ,भावजय,बहिण,भावोजी असा परिवार आहे तर राजेंद्र रिसबुड यांच्या पश्‍चात पत्नी ,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.या घटनेने वेंगुर्लेवर शोककळा पसरली.दरम्यान, या दुर्घटनेची माहिती समजताच वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे कर्मचारी दापोली येथे रवाना झाल्याची माहिती केंद्राचे संशोधक बी एन सावंत यांनी दिली.