Sun, May 19, 2019 13:59
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › नियतीच्या अजब खेळाचे दर्शन : मृत्यूही हेलावला असेल...

नियतीच्या अजब खेळाचे दर्शन : मृत्यूही हेलावला असेल...

Published On: Jul 29 2018 11:13PM | Last Updated: Jul 29 2018 10:53PMप्रमोद पेडणेकर

दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठ कर्मचार्‍यांना घेऊन जाणार्‍या सहलीच्या बसला पोलादपूर-महाबळेश्‍वर मार्गावरील अंंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 30जणांचा गेलेला बळी ही मन विषण्ण करणारी दुर्घटना आहे. या अपघाताला काय म्हणावे? नियतीचा थरार म्हणावा, चालकाचा बेफिकीरपणा म्हणावा की नशिबाला दोष द्यावा? या भयावह अपघाताने संपूर्ण कोकणावरच शोककळा पसरली आहे. दापोली शहरातील एकट्या गिम्हवणे गावाने या अपघातात सात तरूणांना गमावले आहे. पैकी झगडे परिवारातील चार तरूणांचा यामध्ये समावेश आहे. अनेक हरहुन्नरी व सेवेमध्ये तत्पर असलेल्या तरूणांचाही या अपघातात बळी गेल्याने अनेक गावांवर शोककळा पसरली आहे. दापोली शहरावर तर या घटनेने सन्‍नाटाच पसरला आहे. सांत्वन कुणी कुणाचे करायचे, एवढी ही अघटीत घटना. अक्षरश: मृत्यूचे थैमान शनिवारी सर्वांनी अनुभवले. 48 तास या दुर्घटनेला उलटल्यावरही रत्नागिरी जिल्हावासीयच नव्हे तर संपूर्ण कोकणच सुन्‍न मन:स्थितीतून अद्यापही बाहेर आलेला नाही.

कृषी विद्यापीठाचे हे 31 कर्मचारी वीक एंडचा अनुभव घेण्यासाठी महाबळेश्‍वरकडे निघाले होते. पण वाटेतच या कर्मचार्‍यांवर यमाने फास आवळला. दैव बलवत्तर म्हणून प्रताप सावंतदेसाई आश्‍चर्यकारकरित्या या अपघातातून बचावले. नियतीचा हा अजब खेळ म्हणावा लागेल. एकीकडे सावंतदेसाई सुखरुपपणे बाहेर पडले. पण उर्वरित तीसजणांना वाचण्याची कोणतीही संधी देवाने दिली नाही. हा दैवाचा अघोरी खेळच म्हणावा लागेल. सावंतदेसाई यांना या अपघाताने प्रचंड मानसिक धक्‍का बसला आहे. एक हरहुन्‍नरी अधिकारी व नेहमीच सहकार्याची भावना ठेवणारे असा त्यांचा परिचय होता. आपल्या समोरच आपल्या तीस साथीदारांना मृत्युच्या दाढेत जाताना त्यांनी पाहिले. कोणत्याही दुश्मनावरही अशी वेळ येऊ नये, असा तो प्रसंग होता. या जबर धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना काही काळ जावा लागेल. परंतु ते घटनेचे प्रत्यक्ष व एकमेव साक्षीदार असल्यानेच या अपघाताची वार्ता वेळीच समोर आली. त्यामुळे मदतकार्य तातडीने सुरू झाले. या अपघातात मृत्युमुखी पडलेले विद्यापीठाचे तीसही कर्मचारी वीस ते चाळीस वयोगटातील होते. यातील अनेकजण विवाहीत होते. आपल्या कुटुंबातील कर्ते होते. या सगळ्यांचा आधार एका क्षणात नियतीनं हिरावला. त्यांच्या कच्च्याबच्याना व कुटुंबाला पोरके केले. काहीनी तर आपल्या करिअरची नुकतीच सुरुवात केली होती. आपल्या आई-वडिलांचे ते आधार होते, भविष्य होते. परंतु या सर्व कुटुंबांची स्वप्न अपघाताने एका क्षणात चुरडली गेली. विशेष म्हणजे, मृत्युमुखी पडलेले बरेचसे तरूण दापोली तालुक्यातीलच अधिक होते. त्यामुळे या शहरावर पसरलेला सन्‍नाटा भीतीदायकच जाणवत होता. परवा दुपारपासून काल दुपारपर्यंत या सर्वांचे मृतदेह दापोली शहरात येण्यास सुरुवात झाली तसतसा  आक्रोश तीव्र होत होता. हे सर्व हृदयद्रावक वातावरण पाहून मृत्युलाही ओशाळावे वाटले असेल. 

या भीषण अपघातामुळे काही प्रश्‍न मात्र निश्‍चितच उभे राहिले आहेत. यातील नियतीचा भाग सोडाच, परंतु व्यक्‍तीगत पातळीवरही काही भान, बंधने  सांभाळण्याचे दायित्त्व आपण निभवायला हवे, अशीच यातून शिकवण मिळाली आहे. रोजच्या धकाधकीतून आयुष्यात दोन-चार सुखाचे, आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी माणूस पर्यटनस्थळांची वाट धरतो खरी; पण प्रवासाची एक आचारसंहिता मात्र पाळायला विसरतो. लाखमोलाचा जीव  व पाठीमागे या जिवावर अवलंबून असणारे कुटुंबीय याचे भान पुढील काळात सर्वांनीच ठेवायला हवे. आपल्या वाहनांच्या वेगांवर मर्यादा पाळायला हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतंत्र वाहनचालक ठेवायला हवा. खोल दर्‍या व अवघड घाटाने वेढलेल्या रस्त्यांचा प्रवास सतत सतर्कतेने केला पाहिजे. सर्वच दोष प्रशासनाला देऊन चालणार नाही. आपण आयुष्यातील काही आनंदाचे क्षण उपभोगण्यासाठी जात असताना आपल्या बेदरकारपणामुळे काळाला आवतण देण्याचे काही कारण नाही. याचा बोध या अपघातातून सर्वांनी घेतला तर अपघातांची मालिका कमी होईल. कुटुंबाला कर्त्याच्या जाण्याने उद्ध्वस्त होण्याची वेळ येणार नाही. वीक एन्डचा थरार अनुभवताना आपल्या आयुष्याचा ‘द एन्ड’ होणार नाही याची दक्षता सगळ्यांनीच बाळगली पाहिजे. आपल्या कुटुंबातही कच्चे-बच्चे, आई-वडील, पत्नी व कुटुंबिय आहेत. पण स्वत:चा लाखमोलाचा जीवही आहे. याचे सतत स्मरण ठेवायला हवे. 

वास्तविक, कोकणाला अपघातांच्या मालिका फार दूर नाहीत. गेल्या तीन-चार वर्षांमध्येच जगबुडी पुलावरुन ट्रॅव्हल्स कोसळून 42 जणांचा बळी गेला होता, तर महाडचा सावित्री पूल वाहून गेल्याने नदीपात्रात कोसळलेल्या एस.टी. बसमधील 27 जणांचा बळी या अलिकडच्या मोठ्या घटना असल्या तरी छोट्या-मोठ्या अनेक अपघातानी शेकडो बळी गेल्या तीन-चार वर्षांमध्ये गेले आहेत. पुढील काळात महामार्गाचे चौपदरीकरण होईल. पण अपघात रोखले जातील का, हे प्रश्‍न मात्र अनुत्तरीत राहाणार आहेत. आंबेनळी घाट रूंद असला तरी अनेक ठिकाणी संरक्षक कठडे नसल्याचे समोर आले आहे. कालच्या अपघातस्थळीही जेथून बस खाली कोसळली तेथेही कठडा असता तर कदाचित बस थांबली असती. त्यामुळे प्रशासनानेही या सर्व बाबींचा विचार करायला हवा. सर्वच अपघातात नशिबाला दोष देण्याऐवजी वाहनचालकांच्या चुका व प्रशासकीय कमतरता याही तपासायला हव्यात. सार्वजनिक बांधकाम विभागाने भविष्यात तेवढी सतर्कता दाखवली नाही तर ती संवेदनहीनता ठरेल.

शेवटी इतकेच म्हणता येईल, या भीषण अपघातामुळे कोकण कृषी विद्यापीठाने एक तत्पर, गुणवान कर्मचारी वर्ग गमावला आहे. यामुळे विद्यापीठ परिसर आणखी काही काळाने सावरेल. दापोली शहरावरील सन्‍नाटा कालांतराने कमी होईल. काही काळानंतर या अपघाताची चर्चाही थांबेल. परंतु ज्या कुटुंबाने आपला मुलगा, पती, बाप, भाऊ व आधारवडच गमावला आहे  त्या कुटुंबाला मानसिक आधार देण्यासाठी सर्वानीच पुढाकार घ्यायला हवा. त्यांच्या भविष्यासाठी सरकारकडे आवेदन द्यायला हवे. कालच्या अपघातप्रसंगी अनेकांनी बचावकार्यात सहभागी होण्यासाठी धाव घेतली, धडपड केली. माणुसकीचे हे एक वेगळे बंधन दिसून आले. कोणाच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत असा माणूस विरळाच असेल. ही माणूसकी कोकणी माणसामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. माणुसकीचे हे दर्शन आता त्यांच्या कुटुंबीयांना सावरण्यासाठीही दिसायला हवे!