Mon, Aug 19, 2019 05:55होमपेज › Konkan › अंबेनळी अपघात : ‘त्या’26 जणांवर दापोलीत अंत्यसंस्कार

‘त्या’26 जणांवर दापोलीत अंत्यसंस्कार

Published On: Jul 29 2018 11:13PM | Last Updated: Jul 29 2018 11:13PMदापोली : प्रतिनिधी

पोलादपूर-महाबळेश्‍वर मार्गावरील आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाची बस कोसळून झालेल्या अपघातात 30 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी एनडीआरफच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन थांबविले व सर्व मृतदेह पोलादपूर येथे विच्छेदनानंतर दापोलीकडे रवाना झाले. दापोली तालुक्यात  विविध ठिकाणी शोकाकुल वातावरणात 26 मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दापोलीतील कृषी विद्यापीठाचे कर्मचारी शनिवारी महाबळेश्‍वरमध्ये सहलीला जात असताना सकाळी 10.30 च्या सुमारास हा अपघात घडला. गिर्यारोहक आणि एनडीआरएफच्या मदतीने सहाशे फूट खोल दरीतून एक-एक मृतदेह बाहेर काढण्यात आला. शनिवारी रात्री प्रकाशझोतात क्रेनच्या साहाय्याने हे काम सुरू होते. शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंत दापोलीमध्ये आठ जणांचे मृतदेह आणण्यात आले. उर्वरित मृतदेह रविवारी दुपारपर्यंत दापोलीमध्ये दाखल झाले. दापोली परिसरातील लाडघर, हर्णै, बाजारपेठ, गिम्हवणे या भागांत या रुग्णवाहिका दाखल होत होत्या.  

पोलादपूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून सर्व मृतदेह दापोलीमध्ये आणले. यामध्ये विक्रांत शिंदे, सचिन गिम्हवणेकर (गिम्हवणे), नीलेश तांबे (दापोली), संतोष  झगडे  (गिम्हवणे), राजेंद्र  रिसबूड (दापोली), राजीव झगडे (गिम्हवणे), प्रशांत भांबीड (जालगाव), रत्नाकर पागडे (दापोली), सचिन झगडे (गिम्हवणे), प्रमोद शिगवण (दापोली), सुनील कदम (खेर्डी), पंकज कदम (जालगाव), रितेश जाधव (जालगाव), संदीप सुवरे (दापोली), सुनील साटले (जालगाव), राजेंद्र बंडबे (दापोली), सुयश बाळ (लाडघर), संदीप झगडे (गिम्हवणे), रोशन तबीब (हर्णै), सचिन गुजर (वणंद),  हेमंत सुर्वे (दापोली), किशोर चोगले (पाजपंढरी), संदीप भोसले (दापोली), संतोष जालगावकर (दापोली), राजेश सावंत (गिम्हवणे), जयंत चोगले (हर्णै) यांचे मृतदेह दापोलीत रविवारी दुपारपर्यंत दाखल झाले. शोकाकूल वातावरणात या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

पालकमंत्री, जिल्हाधिकारी दापोलीत

पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेडकर, तहसीलदार कविता जाधव, मुख्याधिकारी कविता बोरकर, पोलिस निरीक्षक अनिल लाड हे रविवारी सकाळपासून दापोलीत हजर होते. पालकमंत्री वायकर, योगेश कदम मृतांच्या नातेवाईकांचे ठिकठिकाणी जाऊन सांत्वन करीत होते. सकाळी उर्वरित मृतदेह पोलादपूरहून येऊ लागल्यानंतर दापोलीमध्ये गर्दी होऊ लागली. परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

दापोलीतील बाजारपेठा बंद

अंंबेनळी घाटातील अपघातानंतर शनिवारी सायंकाळपासून एक-एक मृतदेह दापोलीत आणण्यात येत होता. मात्र, रविवारी दापोलीमध्ये बहुतांश मृतदेह आणण्यात आले. त्यामुळे, लाडघर, जालगाव, दापोली आणि गिम्हवणेत अंत्ययात्रा निघाल्या. या स्थितीचे भान ठेवत दापोलीसह तालुक्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवून अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

चार मृतदेह मूळ गावांकडे रवाना

अंबेनळी घाटात झालेल्या भीषण दुर्घटनेतील मृत राजाराम गावडे (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग), प्रमोद जाधव (माहू-मंडणगड), विनायक सावंत (कासर्डे-कणकवली), दत्तात्रय धायगुडे (अहिरे-सातारा) यांचे मृतदेह पोलादपूर येथे विच्छेदन करुन त्यांच्या गावाला पाठविण्यात आले. उर्वरित कर्मचार्‍यांचे मृतदेह दापोलीत आणण्यात आले.