रत्नागिरी : प्रतिनिधी
नियोजन मंडळाच्या निधीमध्ये केंद्राच्या विविध योजनांसाठी 90 टक्के कपात करण्यात आल्याने तुटपंज्या निधीत विकासकामे करताना कसरत करावी लागत आहे. मात्र, याबाबत अन्य जिल्ह्याचे पालकमंत्री मूग गिळून असताना निधीबाबत ओरड केवळ रत्नागिरीतूनच सुरू असल्याचे ना. रवींद्र वायकर म्हणाले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ही कैफियत त्यांनी मांडली.
जिल्हा नियोजन समितीची बैठक मंगळवारी झाली. याबाबत पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, जिल्हा नियोजनामध्ये जिल्ह्याच्या विकासकामांसाठी 300 कोटींचा निधी अपेक्षित आहे. मात्र, यासाठी 170 कोटींचा निधी देण्यात आला असून यामध्ये 90 टक्के कपात केली आहे. कपातीमध्ये 131 कोटींचा निधी शासनाच्या विविध योजनांसाठी वर्ग केल्याने विकसकामांना निधी कमी पडत आहे. मात्र, याबाबत शासनाकडे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांऐवजी कोणीच बोलत नसल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी पर्यटन महोत्सव भरविण्यात येणार आहे. गतवर्षी चिपळूण तालुक्यात पर्यटन महोत्सव झाला होता. या वर्षी मागणी आल्यास रत्नागिरीतही पर्यटन महोत्सव भरविण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात कशेळी ते राजापूर या 208 कि. मी. रस्त्याच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी दीड हजार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्याचे वाटप जवळपास पूर्ण झाले असून 500 कोटींचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार सदानंद चव्हाण, संजय कदम, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक आदी उपस्थित होते.