कुडाळ : शहर वार्ताहर
पावशी ग्रामपंचायतीच्या मागील कार्यकारिणी काळात झालेल्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. शिवाय बरीच कामे मूल्यांकन दाखल्याशिवाय झाली असून काही कामे अपूर्ण आहेत. या सर्व कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत लावून धरली व तसा ठराव घेतला. तब्बल सहा तास चाललेली ही ग्रामसभा विविध विषयांवर झालेल्या गरमागरम चर्चेने वादळी ठरली.
पावशी ग्रामसभा सरपंच भिकाजी कोरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ग्रा.पं. सभागृहात झाली. सभापती राजन जाधव, जि.प.सदस्य अमरसेन सावंत, उपसरपंच दीपक आंगणे, माजी सरपंच श्रीपाद तवटे, प्रसाद शेलटे, सागर भोगटे, भाग्यश्री पावसकर, वैशाली पावसकर, सिमा खोत, यशश्री तेली, चित्रा पावसकर, वृणाल कुंभार, सुप्रिया गोसावी, ग्रामविकास अधिकारी सौ.खोबरेकर, पोलिस पाटील शेखर शेलटे आदींसह सुमारे 165 ग्रामस्थ उपस्थित होते.
26 जानेवारी रोजी तहकूब झालेली ग्रामसभा सोमवारी दुपारी 3.30 वा. पासून रात्री 9 वा. पर्यंत चालली. मिटक्याचीवाडीतील पूरक नळपाणी योजेनेच्या अपूर्ण कामावरून ग्रामस्थांनी मागील कार्यकारिणी काळात झालेल्या सर्व कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. बरीच कामे एकाच ठेकेदाराने केली असून काही अपूर्ण आहेत. तर काही कामांवर मूल्यांकन दाखल्याशिवाय खर्च झाला आहे. या सर्व कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरत ठराव मांडला. त्यावर तत्कालीन सरपंच व विद्यमान सदस्य श्रीपाद तवटे यांनी मागील कार्यकारिणी कार्यकालात झालेली सर्व कामे मासिक सभेत व ग्रामसभांमध्ये मंजूर करून निविदा प्रक्रिया राबवून योग्य पद्धतीने झाल्याचा दावा केला. त्यामुळे कामांची चौकशी लावण्यापेक्षा अपूर्ण कामे सरपंच व कार्यकारिणीने पूर्ण करून घ्यावीत, असे मत नोंदविले. अखेर उपस्थित ग्रामस्थांमधून हात उंचावून मतदान घेत चौकशीचा ठराव घेण्यात आला. माजी सरपंच चंद्रकांत कुंभार यांनी, बरीच कामे मूल्यांकन दाखल्याशिवाय झाल्याचे सांगत कामे अपूर्ण कामे असताना संबंधित ठेकेदाराला बिल अदा कसे केले? असा सवाल केला.
माजी सरपंच मेघराज वाटवे, श्रीनाथ कोकीतकर, अरूण शेलटे, हरि सावंत, उमेश सावंत, बाळा खोत, केदार वाळके, लक्ष्मीकांत तेली, संजय केसरकर, प्रशांत खोचरे, शिरी चव्हाण आदी ग्रामस्थांनी विविध मुद्दे उपस्थित केले. विविध विषयांवर ग्रामस्थांनी चर्चा घडवून आणली. ग्रामपंचायतीच्या फंडातून ग्रा.पं.कार्यालयामागे मंजूर करून निविदा प्रक्रिया झालेल्या हॉलचे काम रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी करून तसा ठरावही घेण्यात आला. मिटक्याचीवाडीसाठी स्वतंत्र वायरमन मिळण्याबाबतचा ठराव ग्रामस्थांनी मांडला. राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात जमीन जाऊन ग्रा.पं.ला 20 लाख रूपये मोबदला मिळणार असल्याचे सांगण्यात आले. पाणीप्रश्न व अन्य विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.