Tue, Jul 16, 2019 00:06होमपेज › Konkan › परमहंस भालचंद्र महाराज यांचा आज 114 वा जन्मसोहळा

परमहंस भालचंद्र महाराज यांचा आज 114 वा जन्मसोहळा

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 06 2018 11:26PM

बुकमार्क करा
कणकवली : प्रतिनिधी

योगियांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांचा 114 वा जन्मसोहळा रविवार 7 जानेवारी रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. गेले चार दिवस बाबांच्या या उत्सवामुळे अवघी कनकनगरी भालचंद्रमय झाली आहे. रविवारी बाबांचा जन्मोत्सव साजरा केला जाणार असून सायंकाळी बाबांच्या पालखीची भव्य मिरवणूक कणकवली शहरातून काढली जाणार आहे. 

बाबांच्या जन्मोत्सवानिमित्त पहाटे काकड आरती, समाधी पूजा, जपानुष्ठान असे विधी होणार आहेत. त्यानंतर सकाळी समाधीस्थानी लघुरूद्र होणार असून 9.30 ते 12 या वेळेत वेतोरे येथील ह.भ.प. भाऊ नाईक हे बाबांच्या जन्मोत्सवाचे कीर्तन सांगणार आहेत. दुपारी 12 वा. बाबांची बालमूर्ती पाळण्यात घालून जन्मसोहळा साजरा केला जाणार आहे. त्यानंतर आरती आणि महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी 5 वा. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची हत्ती, उंट, घोडे तसेच सिंधुदुर्ग वारकरी सांप्रदाय यांच्या समवेत 
कणकवली शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. 

फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात काढली जाणारी मिरवणूक ही सार्‍यांचेच आकर्षण असते. रात्री आरती आणि नंतर कलेश्‍वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांच्या नाट्यप्रयोगाने या उत्सवाची सांगता होणार आहे. 

शनिवारी बाबांच्या उत्सवाच्या चौथ्या दिवशीही भाविकांची अलोट गर्दी होती. हजारोंच्या संख्येने भाविकांनी समाधी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.