Thu, Jul 18, 2019 04:34होमपेज › Konkan › करजुवेनजीक बिबट्याचा सांगाडा

करजुवेनजीक बिबट्याचा सांगाडा

Published On: Jan 31 2018 12:00AM | Last Updated: Jan 31 2018 12:00AMआरवली : वार्ताहर

संगमेश्‍वर तालुक्यातील करजुवे-धामापूर गावांच्या सीमेवरील जंगलात मृतावस्थेतील बिबट्याचा कुजलेला सांगाडा सापडला आहे. त्याचा महिनाभरापूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, या बिबट्याचा हा मृत्यू नैसर्गिक होता की कुणी त्याची हत्या केली, याचा उलगडा मात्र होऊ शकलेला नाही.

करजुवे तसेच धामापूरतर्फे संगमेश्‍वर गावांच्या सीमेवर धनावडेवाडीजवळ जंगलातून मंगळवारी करजुवे वाकसाळवाडी येथील शरद बोलवणकर हे जात असताना त्यांना काही तरी कुजल्याचा वास आला. अधिक शोध घेताना त्यांना काही हाडे आढळली. हाडांजवळच बिबट्याचे कातडेही आढळल्याने हा सांगाडा बिबट्याचा असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिस पाटलांमार्फत याची माहिती  देवरूखचे वनपाल विलास मुळे यांना दिली. यानंतर मुळे तसेच त्यांचे सहकारी वनरक्षक सं. ब. वडर, पोलिसपाटील रवींद्र पडवळ, शरद बोलवणकर, महेंद्र सीताराम कानाल, ऋषिकेश आनंद डावल हे घटनास्थळी दाखल झाले.

बिबट्याचा सांगाडा आढळलेले ठिकाण अत्यंत दुर्गम भागात आहे. घटनास्थळी बिबट्याचे थोडे कातडे हाडे, तसेच सांगडाही आढळला. हे सर्व अवयव ताब्यात घेऊन वनाधिकार्‍यांनी पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी हे सर्व अवयव तपासले असता, या बिबट्याचा सुमारे 1 महिन्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.