Wed, Jun 26, 2019 11:33होमपेज › Konkan › पं.स.ला व सदस्यांना विचारतो कोण?

पं.स.ला व सदस्यांना विचारतो कोण?

Published On: Feb 18 2018 1:59AM | Last Updated: Feb 17 2018 10:55PMमालवण : प्रतिनिधी

पंचायत समिती सदस्यांनी शासनाच्या योजनांतर्गत कामांची एखादी यादी मंजुरीसाठी पाठविली असता तालुक्यातील एका जि. प. सदस्याने त्यात हस्तक्षेप करत पं.स.ला विचारतो कोण? या वक्‍तव्याचे आज मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत पडसाद उमटले. जि.प. सदस्याचे हे वक्तव्य अपमानास्पद असून  जि. प.सदस्य पंचायत समिती व सदस्यांनी केलेला ठराव मानत नसतील तर त्यांची मनमानी आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा पं.स.चे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य सुनील घाडीगावकर यांनी मासिक सभेत दिला.जि. प.सदस्य हे  पंचायत समितीला  कमी लेखत असतील तर ते चुकीचे आहे. पं. स.सदस्यांनी विविध योजनांतर्गत प्राधान्याने सुचविलेली कामे डावलली जात असतील तर त्याची तपासणी केली जाईल असे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

मालवण पं. स.ची मासिक सभा शनिवारी छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती मनीषा वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सहायक गटविकास अधिकारी संजय गोसावी, पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगावकर, राजू परुळेकर, कमलाकर गावडे, अजिंक्य पाताडे, विनोद आळवे, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, सोनाली कोदे, सागरिका लाड, गायत्री ठाकूर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. 

शिरवंडे नळपाणी योजनेचे काम वीजपुरवठ्याअभावी रखडले आहे. त्यामुळे महावितरणकडून पूर्वी झालेला सर्व्हे चुकीचा असल्याने नव्याने सर्व्हे करून वीजपुरवठ्याची सुविधा द्यावी. सध्या शिरवंडेवाडी येथे कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. याठिकाणी तीन विद्युत खांब उभारल्यास समस्या सुटू शकेल. मात्र सद्यस्थिती पाहता गावात किती विद्युत खांब पडले आहेत याची माहिती महावितरण कंपनीलाही नसेल असे श्री. घाडीगावकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. 

रेवंडी कोणीवाडी येथील विहिरीवरून गावातील एका वाडीवर अन्याय करत केवळ दोनच वाडींना पाणीपुरवठा करत राजकारण केले जात आहे असा आरोप सोनाली कोदे यांनी केला. या विहिरीचे पाणी दूषित असल्याचा अहवाल प्राप्त असतानाही ते पाणी का सोडले जात आहे अशी विचारणाही त्यांनी केली. हा विषय ग्रा.पं.पातळीवरील असल्याने आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले.

तालुक्यातील खड्डेमय रस्ते तसेच अन्य समस्यांसाठी निधीच उपलब्ध नसल्याचे विविध खात्यांच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात आमदार, खासदार यांच्या दुर्लक्षामुळेच निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत असल्याचे सौ. कोदे यांनी सांगितले. पंचायत समिती सभापती पशुसंवर्धन समिती सदस्य असल्याने त्यांना स्वनिधी देण्यात यावा असा ठराव घेण्यात आला. आंगणेवाडी यात्रेत प्रशासनाच्या सर्व विभागांचे चांगले सहकार्य मिळाल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव गायत्री ठाकूर यांनी मांडला.