Thu, Jul 18, 2019 02:03होमपेज › Konkan › पाण्यासाठी ग्रामस्थ करणार उपोषण

पाण्यासाठी ग्रामस्थ करणार उपोषण

Published On: Apr 23 2018 11:12PM | Last Updated: Apr 23 2018 8:55PMचिपळूण : प्रतिनिधी

तालुक्यातील दसपटी विभागातील नांदिवसे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना गेल्या अडीच महिन्यांपासून बंद आहे. ‘महावितरण’ने विद्युत पुरवठा तोडल्याने ही समस्या निर्माण झाली असून ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागातील लोकांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागत आहे. या संदर्भात कोणीच दखल घेत नसल्याने कळकवणे, ओवळी व वालोटी येथील ग्रामस्थांवर पाण्यासाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे. दि. 27 एप्रिल रोजी पंचायत समितीसमोर हे उपोषण होणार आहे.

नांदिवसे पाणीपुरवठा योजना 1986मध्ये सुरू झाली. मात्र, तेव्हापासूनच अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. त्यानंतर 2011 मध्ये वाढीव पाणीपट्टीचा निर्णय झाला. या दरवाढीला तिन्ही गावांतील ग्रामसभांनी विरोध केला व तसे ठराव जिल्हा परिषदेकडे सादर केले. परंतु,या ठरावाकडे जि. प.ने दुर्लक्ष केले.

या संदर्भात प्रशासनाने ग्रामपंचायतीला काहीच कल्पना दिली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत जुन्या दरानेच पाणीपट्टी वसूल करण्यात आली. यामुळे नव्या व जुन्या दरातील फरक थकीत म्हणून दाखविण्यात आला. परिणामी, ‘महावितरण’चे 18 लाखांचे वीज बिल थकीत राहिले. वीज बिल थकीत असल्याचे कारण देत ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांनी या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे ही योजना ठप्प झाली आहे. या संदर्भात पं. स. सभापती पूजा निकम, सदस्य बाबू साळवी, नितीन ठसाळे यांनी जि. प. तसेच वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. आ. सुनील तटकरे यांच्यामार्फत ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची भेट घेतली व दरमहा थकीत बिलापोटी एक लाख रुपये भरण्याचा निर्णय झाला. परंतु, या बाबत महावितरणने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे. शिवाय जिल्हा परिषदने आधी पाणीपट्टी जमा करा, असे आदेश काढले आहेत. 

दरम्यान, ही योजना सुरू व्हावी, यासाठी तिन्ही गावांतील ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत. परंतु, याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने कळकवणे, ओवळी व वालोटी ग्रामस्थांनी अखेर पंचायत समिती कार्यालयापुढे उपोषणाचा निर्णय घेतला आहे.  कळकवणे सरपंच कविता आंबेडे, उपसरपंच सतीश सुर्वे, ओवळीचे सरपंच सुदेश शिंदे, उपसरपंच प्रीतम शिंदे, वालोटी सरपंच अजय गोटल, उपसरपंच मनीषा कदम यांच्यासह तिन्ही ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य  व ग्रामस्थांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. 

या बाबत पं. स., जि. प., ‘महावितरण’ व अन्य खात्यांना निवेदने देण्यात आली आहेत. ग्रामस्थ बेमुदत उपोषण करणार असून ऐन पाणीटंचाईच्या काळात योजना बंद असल्याने ग्रामस्थांवर उपोषणाची वेळ आली आहे.