Wed, Apr 24, 2019 15:41होमपेज › Konkan › अंकिता मृत्युप्रकरणी साखळी उपोषण

अंकिता मृत्युप्रकरणी साखळी उपोषण

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 10:42PMखेड : प्रतिनिधी

 तालुक्यातील एनवली येथील अंकिता सुनील जंगम हिच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे. येथील पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी अ. भा. वीरशैव लिंगायत महासंघातर्फे संशयितांवर खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी करत बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर हे उपोषण सुरु झाले आहे.

तालुक्यातील ऐनवली गयेथील असलेल्या अंकिता जंगमचा मृतदेह कुडोशी गावानजीक नदीपात्रात ती बेपत्ता झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी सापडला होता. याप्रकरणी अंकिताच्या नातेवाईकांनी तिचा घातपात झाला असल्याची शंका व्यक्‍त करत संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून काही जणांविरोधात अंकिताला आत्महत्येस प्रवृत्त करून तिचा मृत्यू झाला आहे, हे माहिती असूनही प्रकार लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. परंतु, या प्रकरणी पोलिसांनी अद्याप खुनाचा गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी अंकिताचा शवविच्छेदन अहवाल व तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांच्या प्राप्त अहवालात तिचा घातपात झाल्याचे स्पष्ट होत नाही. परंतु, अ. भा. वीरशैव लिंगायत महासंघातर्फे याबाबत काही दिवसांपूर्वीच अनेक मुद्दे उपस्थित करत खुनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी लावून धरली आहे.

अ. भा. वीरशैव लिंगायत महासंघाचे अध्यक्ष विष्णू जंगम, कार्याध्यक्ष तथा प्रवक्‍ते डॉ. विजय जंगम, महासचिव अजित जंगम, प्रकाश जंगम, अंकिताचे वडील सुनील जंगम, सदानंद जंगम  आदींसह ग्रामस्थांनी सोमवारी येथील  उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.  सकाळी 10 ते सायं. 6 या शासकीय कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेत हे साखळी उपोषण केले जाणार आहे. अंकिता जंगम हिच्या मृत्यू प्रकरणी सर्व संशयितांना अटक करून त्यांच्यावर हत्या केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

या उपोषणाला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असून अंकिता जंगम हिच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई व्हावी, यासाठी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक् केला आहे.