Thu, Apr 25, 2019 23:52होमपेज › Konkan › शेकडो परप्रांतीय पर्ससीन नौकांचा धुमाकूळ

शेकडो परप्रांतीय पर्ससीन नौकांचा धुमाकूळ

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 02 2018 9:43PMमालवण : प्रतिनिधी

अधिकृत पर्ससीन मासेमारीला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सिंधुदुर्ग किल्ला ते निवतीपर्यंतच्या सुमारे दहा ते बारा वाव समुद्रात परराज्यांतील सुमारे शंभरहून अधिक हायस्पीड तसेच पर्ससीनधारकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. सायंकाळपासून किल्ल्यालगतच्या समुद्रात शेकडोंच्या संख्येने घुसखोरी केलेल्या या पर्ससीन ट्रॉलर्सकडून मासळीची लूट सुरू आहे. त्यामुळे समुद्रातील संघर्ष उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात 1 ऑगस्टपासून झाली, तर अधिकृत पर्ससीनधारकांची मासेमारी 1 सप्टेंबरपासून सुरू झाली. अशा परिस्थितीत पहिल्याच दिवशी किल्ल्यापासून निवतीच्या समुद्रात दहा ते बारा वाव समुद्राच्या आत परराज्यांतील शेकडो हायस्पीड तसेच पर्ससीनधारकांनी घुसखोरी केल्याचे दिसून आले. रात्रीच्या वेळी या हायस्पीड आणि पर्ससीनच्या नौकांवरील लख्ख प्रकाश किनारपट्टीजवळ दिसून आला. याबाबतची माहिती स्थानिक तसेच निवतीतील मच्छीमारांनी दिली. 

सध्या किनार्‍यालगत स्थानिक पारंपरिक तसेच रापणकर मच्छीमारांना मासळीची चांगली कॅच मिळत आहे. चांगली मासळीच्या कॅचमुळे सुखावत असलेल्या मच्छीमारांना परराज्यातील हायस्पीड, पर्ससीनची घुसखोरी डोकेदुखी ठरत आहे. यातच आजच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी केलेल्या परराज्यातील ट्रॉलर्समुळे मच्छीमारांमधील संघर्ष पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे मच्छीमारांना मासळीची चांगली कॅच मिळत असताना सत्ताधारी आपल्याच पाठपुराव्यामुळे मासळी जाळ्यात येत असल्याचे सांगत आहेत. मग दुसरीकडे परराज्यांतील हायस्पीड, पर्ससीनधारकांची घुसखोरी, अतिक्रमण का थांबविले जात नाही, असा प्रश्‍न मच्छीमारांमधून विचारला जात आहे. हंगामात परराज्यातील ट्रॉलर्सधारकांनी घुसखोरी सुरू केल्याने मत्स्य व्यवसाय विभागाकडून कोणती कारवाई केली जाणार याकडे मच्छीमारांचे लक्ष लागून राहिले आहे.