Sat, Jul 20, 2019 23:43होमपेज › Konkan › सिंधुदुर्गनगरीत साकारणार ‘घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प’

सिंधुदुर्गनगरीत साकारणार ‘घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प’

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 23 2017 9:03PM

बुकमार्क करा

ओरोस : प्रतिनिधी

सिंधुदुर्गनगरी शहर हे एक सुंदर शहर निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी वेंगुर्ले शहर धर्तीवर सिंधुुदुर्गनगरीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासाठी सिंधुदुर्गनगरी येथे ओरोस, रानबांबुळी, अणाव या तीनही ग्रा.पं.च्या सरपंचासमोर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.  सर्वांनीच हा  प्रकल्प राबविण्यास सहमती दर्शविली. किंबहुना प्लास्टीक मुक्तीही राबवून कचरामुक्त शहर बनविण्याचा प्रयत्न आहे. 

  सिंधुदुर्गनगरी शहर हे भविष्यात नगरपंचायत होणार आहे. त्यामुळे या शहराचे विस्तारीकरण वाढत आहे. दिवसेंदिवस लोकसंख्याही वाढत आहे. त्याच बरोबर या शहरामध्ये कचर्‍याचाही प्रश्‍न गंभीर होत आहे. सद्यस्थितीत ओरोस ग्रा.पं. गावातील कचरा घंटागाडीद्वारे गोळा करते तर प्राधिकरणामार्फत प्राधिकरण वसाहतीमधील कचरा आठवड्यातून एकदा गोळा केला जातो. मात्र रानबांबुळी-अणावमध्ये अशाप्रकारे कचरा गोळा करण्याची व्यवस्था नाही. भविष्यात ही तीनही गावे एकत्रित होवून नगरपंचायत झाल्यास कचर्‍याचा प्रश्‍न वाढतच जाणार आहे.  याचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सिंधुदुर्गनगरी शहरामध्ये घनकचरा प्रकल्प राबविण्याच्यादृष्टीने ठाणे येथील एका एजन्सीला बोलवून अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या उपस्थितीत  घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचे सादरीकरण केले.

 ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, रानबांबुळी सरपंच संध्या परब यासह तीनही गावचे  नवनिर्वाचीत सरपंच उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविल्यास सकारात्मकता दर्शविली. वेंगुर्ले शहरामध्ये न. प. ने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला आहे तो संपूर्ण राज्याला आदर्श ठरला. मात्र याच धर्तीवर सिंधुदुर्गनगरी शहरामध्येही घनकचरा प्रकल्प राबविताना प्रत्येक कुटंबाकडील  ओला, सुका कचरा स्वतंत्र गोळा केला जाणार आहे. तसेच गृहनिर्माण संस्था यांनाही संस्थेच्या इमारत परिसरात स्वतंत्रपणे ओला, सुका कचर्‍यासाठी कुंड्या ठेवून कचरा गोळा केला जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबरोबर प्लास्टीकमुक्तीही केली जाणार आहे. भविष्यात कचरामुक्त सिंधुदुर्गनगरी शहर बनविण्याचा प्रयत्न  आहे.