होमपेज › Konkan › नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटकांची सिंधुदुर्गला पसंती

नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटकांची सिंधुदुर्गला पसंती

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 11:24PM

बुकमार्क करा

ओरोस : संजय वालावलकर

नाताळ उत्सवासह सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करण्यासाठी पर्यटकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, वेंगुर्लेसह किनारपट्टीला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल बुकिंग 5 जानेवारीपर्यंत हाऊसफुल झाली असून सागरी पर्यटनाबरोबर कृषी, धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लाखो देशी-परदेशी पर्यटक सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दाखल झाले आहेत.

पर्यटकांचा ओघ वाढतोय

कोकण किनारपट्टीवरील गणपतीपुळेसह सिंधुदुर्गातील मालवण, वेंगुर्ले किनारपट्टीला पर्यटकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. किनारपट्टी भागातील हॉटेल, तंबू निवाससह निवास न्याहरी ठिकाणे हाऊसफुल्ल झाली आहेत. सर्वाधिक पसंती मालवण किनारपट्टीला असून तारकर्ली, देवबाग, दांडी, सिंधुदुर्ग किल्ला या ठिकाणांवर दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढतच जाते. राज्याबरोबर देशाच्या कानाकोपर्‍यातून येणारा पर्यटक यापूर्वी गोव्याकडे पसंती दिसून येत होती; परंतु अलीकडच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यास सर्वाधिक पसंती दिली जात आहे. कोकण पर्यटन माध्यमातून अनेक ठिकाणी पर्यटन सुविधा उभारण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. निवती, भोगवेसारखी अनेक पर्यटन ठिकाणे, किल्ले नावारूपास येतील. लवकरच चिपी विमानतळाचे काम पूर्ण होऊन येणार्‍या विमानांमुळे अनेक परदेशी पर्यटक येथील    निसर्गाचा आनंद घेणार आहेत. यामुळे आर्थिक उन्नतीतही वाढ होईल.पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन हॉटेलचीही संख्या मालवणसह जिल्हाभरात वाढत असून पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी येथील व्यावसायिक पुढाकार घेत आहेत. 

तंबू, कॉटेज,हॉटेल सुविधावर भर

सीआरझेड कायद्यामुळे किनारपट्टी भागात बांधकामावर येणारे निर्बंध लक्षात घेता आधुनिक सोयीसुविधांयुक्त पर्यटन हाऊसची  उभारणी ही अनेकांनी केली पाहिजे. तसेच किनारपट्टीवर कॉटसुविधा उपल्ब्ध केली जात आहे.सिंधुदुर्गात वॉटर स्पोर्टस, पॅरासेलींग बोटिंग व स्कूबा ड्रायव्हिंगला पर्यटकांनी अधिक पसंती दिली असल्याचे दिसत आहे.

चिवला बीच वॉटरपार्कला सर्वात जास्त पसंती

किनारपट्टीवरील सर्वांत सुरक्षित बीच म्हणून ‘चिवला बीच’ ओळखला जातो. याठिकाणी गेल्या काही वर्षात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. तर येथील पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र येत वॉटरस्पोर्टस, पॅरासेलींग बोटींग व स्कूबा ड्रायव्हिंग पर्यटकांना उपलब्ध करून दिली आहे. किल्ला सिंधुदुर्गच्या अगदी समोर साकारलेले दांडी बीच,सी वर्ल्ड पार्क पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. कोकण किनारपट्टीवर उभारणी झालेल्या या पहिल्या ‘वॉटरपार्क’चा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांसोबत बच्चे कंपनीही आतुर आहेत. 31 डिसेंबर आणि नाताळ सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून किनारपट्टी पर्यटकांनी फुलून गेली आहे.