Mon, Apr 22, 2019 21:39होमपेज › Konkan › चांदा ते बांदा योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी : ना. केसरकर

चांदा ते बांदा योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी : ना. केसरकर

Published On: Jul 07 2018 10:42PM | Last Updated: Jul 07 2018 10:21PMओरोस : प्रतिनिधी

चांदा ते बांदा अंतर्गत नैसर्गिक साधन संपत्तीतून आर्थिक विकासाचे सूत्र निश्‍चित केले आहे. नियमित शासकीय निधीशिवाय या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. या निधीचा पुरेपूर वापर होऊन आर्थिक संपन्नतेबरोबरच रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार आहे. चांदा ते बांदा योजनेतील सर्व निधीचा वापर सुयोग्य रितीने व्हावा, यासाठी अधिकारी वर्गाने दक्षता घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कुडाळ विश्रामगृहावर आयोजित चांदा ते बांदा योजनेच्या आढावा बैठकीत केली.

या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगताप, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, 
नियोजन अधिकारी श्री. धनवडे, लेखा अधिकारी विकास पाटील, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन.ए.सोनवणे, मत्स्यविभाग अधिकारी श्री. महाडिक आदी उपस्थित होते.

भाताच्या श्री पद्धत लागवडीखाली जिल्ह्यात 900 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड यशस्वी पूर्ण झाली आहे. चांदा ते बांदा योजनेतून लागवडीसाठी योजना प्रस्तावित करावी, कृषी सखी, पशू सखी, मत्स्य सखी यांच्या निवडीची प्रक्रिया येत्या पंधरा दिवसात पूर्ण करावी, तिलारी पाटबंधारे अंतर्गत वन औषधी तसेच करवंद, जांभूळ, रानकेळी, फणस वगैरे लागवडी संदर्भात प्रस्ताव त्वरीत तयार करावा, चांदा ते बांदा अंतर्गत विविध विभागाच्या योजना अंतर्गत अर्ज मागविण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करावी, खादी ग्रामोद्योग विभागाने निरापासून साखर निर्मिती बाबत प्रशिक्षणाची कार्यवाही त्वरित पूर्ण करावी, निरापासून तयार होणार्‍या साखरेच्या मार्केटिंगबाबत संबंधित संस्थेशी चर्चा करावी, आदी सूचना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी या बैठकीत केल्या.