होमपेज › Konkan › बेरोजगारांसाठी हक्‍काचा आवाज उभा करूया : सुनील तटकरे

बेरोजगारांसाठी हक्‍काचा आवाज उभा करूया : सुनील तटकरे

Published On: Jun 13 2018 10:32PM | Last Updated: Jun 13 2018 10:02PMओरोस : प्रतिनिधी

गेली पाच वर्षे कार्यकर्त्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करून केवळ सत्ता उपभोगणार्‍या भाजपाच्या आयात उमेदवाराचा पराभव करून बेरोजगार व पदवीधरांसह कोकणातील प्रश्‍न सोडविण्यासाठी नजीब मुल्ला यांच्या माध्यमातून कोकणचा आवाज उभा करूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे यांनी केले.

सिंधुदुर्गनगरी येथे शरद कृषी भवनात कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, पी. आर. पी. कवाडे गट, समाजवादी पार्टी, लोकशाही आघाडीचे उमेदवार नजीब सुलेमान मुल्ला यांच्या निवडणूक प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी सुनील तटकरे, उमेदवार नजीब मुल्ला, जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, पुष्पसेन सावंत, नंदूशेठ घाटे, महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, काँग्रेस सरचिटणीस प्रकाश जैतापकर, शिक्षक संघटनेचे ऐनापुरे, माजी जि. प. सदस्या रेवती राणे, राज राजापूरकर आदींसह राष्ट्रवादी, काँग्रेसचे कार्यकर्ते  उपस्थित होते. 

सुनील तटकरे म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्रात व पुरोगामी विचारात शरद पवारांचे  योगदान मोलाचे आहे. पाच वर्षांपूर्वी कोकणातील पदवीधरांसाठी मेहनत घेऊन निरंजन डावखरेंना विजयी केले. मात्र त्यांनी कार्यकर्तेे, बेरोजगार व पदवीधरांकडे पाठ फिरवत केवळ सत्ता उपभोगल्याचा आरोप श्री. तटकरे यांनी केला. आता याचा उपभोगासाठी ते भाजपाचा आयात उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.अशा शब्दात त्यांनी श्री. डावखरेंची खिल्ली उडवली. गेली चार वर्षे राज्य व केंद्र शासन केवळ अच्छे दिनांचे दिवास्वप्न  दाखवत आहे.  मात्र अच्छेदिन सोडाच वाढती महागाई, पेट्रोल दरवाढ, वाढती बेरोजगारी आदी समस्यांमुळे  सर्वसामान्य नागरिक बेहाल झाला आहे,  अशी टीका त्यांनी केली.  पदवीधर मतदारसंघातून निवडून जाणारे राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला हे बेरोजगारांना रोजगार, शिक्षण या समस्यांवर काम करतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. ज्यांनी कार्यकर्त्यांचा व शरद पवारांचा विश्‍वासघात केला त्यांच्या पराभवासाठी जिद्दीने काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

उमेदवार नजीब मुल्ला म्हणाले, ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून केलेल्या कामामुळे मला चार वेळा मला ठाणेकरांनी अटीतटीच्या लढतीत निवडून दिले. कार्य कौशल्य संघटन कामातून गेल्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे चार नगरसेवक निवडून आणू शकलो. आता कोकणातील पदवीधरांचे, बेरोजगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काम करण्याची इच्छा आहे.

जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, शिक्षक संघटनेचे ऐनापुरे, काँग्रेस सरचिटणीस प्रकाश जैतापकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल आदींनी विचार मांडले. आभार राष्ट्रवादी कार्याध्यक्ष प्रसाद रेगे यांनी मानले.