Tue, Apr 23, 2019 23:46होमपेज › Konkan › धनादेशात फेरफार करून बँकेची फसवणूक : संशयिताला अटक

धनादेशात फेरफार करून बँकेची फसवणूक : संशयिताला अटक

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 10:16PMओरोस : प्रतिनिधी

800 रुपये रकमेच्या चेकमध्ये छेडछाड करून 8 लाख 80 हजार रुपये बँकेतून काढल्याप्रकरणी फरारी असलेल्या एका आरोपीला नवी मुंबई येथून अटक करण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे.

पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी याबाबत माहिती दिली असून, फरारी असलेल्या इतर दोन संशयित आरोपींना अटक करावयाचे असल्या कारणाने अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे. 

2014 सालात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुडाळ शाखेत उमिया अर्बन को-ऑप. बँक नागपूर या बँकेचा 800 रु. रकमेचा चेक वटविण्यात आला. या चेकमध्ये 8 लाख 80 हजार रु. अशी रक्कम टाईप करून फेरफार करून तो वैयक्तिक खात्यात जमा करण्यात आला व नंतर ही रक्कम काढण्यात आली. याबाबत अतुलकुमार कश्यप (वय 37) यांनी कुडाळ पोलिस स्थानकात तक्रार दिली. यानुसार स्टेट बँक कुडाळ आणि उमिया अर्बन बँक यांची फसवणूक झाल्याचा गुन्हा कुडाळ पोलिस स्थानकात दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास करताना पाच आरोपी निश्‍चित करण्यात आले. यातील दोन आरोपींना कुडाळ पोलिसांनी त्याच वेळी अटक केली; मात्र तिघे संशयित आरोपी फरार होते. 

सिंधुदुर्ग पोलिसांच्या दप्तरी या तीन संशयित आरोपींना फरार म्हणून नोंद करण्यात आले होते. यातील एक आरोपी बंगळूर येथे असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरीक्त पोलिस निरिक्षक प्रकाश गायकवाड यांनी या आरोपींच्या शोधासाठी मोहिम सुरू केली. स्थानिक गुन्हा अन्वेशनाचे पोलिस निरिक्षक प्रल्हाद पाटील यांनी तपास सुरू केला. त्यासाठी पथक नेमले. या पथकामध्ये प्रल्हाद पाटील यांच्यासह सुधीर सावंत, अनुपकुमार खंडे, प्रवीण वालावलकर, कांदळगावकर, सुजाता शिंदे यांचा  समावेश करण्यात आला. या पथकाने संबंधित आरोपीचा माग काढत नवी मुंबई येथे या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. इतर दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधिक्षकांनी सांगितले.