Thu, Jul 18, 2019 06:16होमपेज › Konkan › एनआरएचएम कर्मचार्‍यांचे जि.प.समोर बेमुदत धरणे

एनआरएचएम कर्मचार्‍यांचे जि.प.समोर बेमुदत धरणे

Published On: Apr 13 2018 10:36PM | Last Updated: Apr 13 2018 10:02PMओरोस : प्रतिनिधी

राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचार्‍यांचे शासन सेवेत विनाशर्त समायोजन करणे, कर्मचार्‍यांना विमा संरक्षण लागू करणे यासह अन्य विविध न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने गुरुवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्‍वभूमीवर महासंघाने शुक्रवारी जि. प. भवनासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेे. 

एनआरएचएम कंत्राटी कर्मचार्‍यांच्या वतीने आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हेमदीप पाताडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या धरणे आंदोलनात अजित सावंत, सुवर्णा रावराणे, ए. आर. गावडे यांच्यासह शेकडो कर्मचारी, संघटना प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. ‘कायम करा कायम करा...एनआरएचएमवाल्यांना कायम करा’, ‘झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. समायोजन झालेच पाहिजे, एनआरएचएम संघटनेचा -विजय असो  यासह विविध घोषणा देत सिंधुदुर्गनगरी दणाणून सोडली. राज्यात 2005 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झाले. जिल्ह्यात या अभियानांतर्गत 456 अधिकारी व कर्मचारी आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी या अभियानाचा मोठा सहभाग आहे. यातील सर्व कर्मचारी हे कंत्राटी स्वरूपाचे असून नियमित कर्मचा-यां प्रमाणेच पूर्णवेळ काम करत आहेत. मिळालेल्या अल्प मोबदल्यात शासनाने दिलेल्या सर्व कामकाजाची पूर्तता करत आहेत. प्रत्येक कर्मचा-यांने 10 ते 12 वर्षे सेवा बजावली आहे. एवढा कालखंड या सेवेत घालवल्यानंतर प्रत्येक वर्षी प्रतिनियुक्ती प्रक्रियेमध्ये काही अन्यायकारक बदल करण्यात येत आहेत. एनआरएचएम च्या कर्मचा-यांना सेवेत कायम करण्याच्या दृष्टीने सरकारने एक समिती नियुक्त केली आहे. या समितीने तीन महिन्यांत याबाबत शासनास अहवाल सादर करणे आवश्यक होते. परंतू आश्‍वासना शिवाय कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मात्र, या समितीचा निर्णय येण्यापूर्वीच शासन नवीन भरती प्रक्रिया राबवून पुनर्नियुक्तीमध्ये जाचक अटी अनुभवी कर्मचा-यांसाठी अन्यायकारक आहे. यासाठी राष्ट्रिय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या वतीने 11 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. तर गुरुवार 12 एप्रिल रोजी काळ्या फीती लावून काम बंद आंदोलन केले होते. या आंदोलनाचा पुढील टप्प्या म्हणून या कर्मचार्‍यांनी  शुक्रवारपासून जि. प. भवनासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.