Fri, Apr 26, 2019 19:20होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : महिलेचे साडेचार लाखांचे दागिने लंपास

सिंधुदुर्ग : महिलेचे साडेचार लाखांचे दागिने लंपास

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 11 2018 11:32PMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली-आचरा मार्गे मालवण या एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने सौ. अमिता केशव मसुरकर (70, मूळ गाव आडवली, सध्या रा. कणकवली-शिवाजीनगर) यांच्या खांद्याला लावलेल्या छोट्या बॅगमधील (पर्स) रुमालात बांधून ठेवलेले सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. त्यांची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे साडेचार लाख आहे. ही घटना मंगळवारी दुपारी 1.45 वा. च्या सुमारास कणकवली बसस्थानकावर घडली.

गणपती सण असल्याने सौ. अमिता मसुरकर आणि त्यांचे पती हे कणकवली-आचरा मार्गे मालवण या बसमधून आपल्या मूळ गावी आडवली, ता. मालवण येथे निघाले होते. दुपारी 1 वा. सुटणारी ही बस काहीशी उशिराने फलाटावर लागली. यावेळी प्रवाशांची एकच गर्दी झाली होती. सौ. मसुरकर या बसमध्ये चढल्यानंतर वाहकाच्या बाजूला असलेल्या सीटवर बसल्या. त्यावेळी त्यांना पर्सची चेन उघडलेली दिसली,. त्यांनी आत हात घालून पाहिले असता रूमालात दागिने बांधून ठेवलेली आतील छोटी पर्स गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामध्ये तीन हार, एक मंगळसूत्र, दोन लहान सोनसाखळ्या, सहा लहान अंगठ्या, दोन मोठ्या अंगठ्या, एक रिंग, एक झुंबर, एक साखळी, एक कुडीजोड असे मिळून 15 तोळ्याचे दागिने होते. या पर्सबरोबरच एका बँकेचे पासबुकही चोरट्याने लंपास केले. यामुळे सौ. अमिता मसुरकर यांना मोठा धक्‍का बसला. त्यांनी वाहकाला हा प्रकार सांगितला असता वाहकाने वाहतूक नियंत्रक कक्षाकडे तक्रार करा असे सांगत बस फलाटावरून मार्गस्थ केली. खरे तर चोरीची घटना घडल्यानंतर ही बस प्रवाशांसहित कणकवली पोलिस स्थानकात तपासणीसाठी नेणे आवश्यक होते. मात्र त्या वाहकाने सौ. मसुरकर यांची दखल न घेत गाडी रवाना केली. कदाचित एखादा चोरटा बसमध्ये असता तर तो सापडू शकला असता. त्यामुळे संबंधित वाहकाच्या बेजबाबदारापणाबद्दल सौ. मसुरकर कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्‍त केला. 

कणकवली पोलिस स्थानकात याबाबतची खबर सौ. मसुरकर यांनी दिली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मंगळवारी कणकवली शहरात एका खाजगी कार्यालयात कामास असलेल्या एका युवतीची पर्सही अज्ञात चोरट्याने लंपास केली. यात दोन हजार रू.रोख आणि एसटी पास होता. सध्या गणेशोत्सवामुळे बसस्थानकांवर प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. त्याचा चोरटे फायदा घेत आहेत. त्यामुळे कणकवली पोलिसांनी त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्याची गरज असून अधिक सतर्कपणे काम करावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.