Sun, May 26, 2019 01:31होमपेज › Konkan › रत्नागिरीत उभारणार खुले कारागृह!

रत्नागिरीत उभारणार खुले कारागृह!

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 23 2018 10:28PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शहरातील विशेष कारागृहामध्ये लवकरच खुल्या कारागृहाची संकल्पना राबविण्यात येणार असून, यासाठी लागणारी मंजुरी अंतिम टप्प्यात आली आहे. चांगले वर्तन करणार्‍या कैद्यांना या तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. येथे त्यांना सुधारण्याची संधी देण्यात येणार असून विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

राज्यात पैठण, औरंगाबाद, गडचिरोली, विसापूर, मोरशी, येरवडा, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, अमरावती, ठाणे आणि अकोला येथे खुली कारागृहे आहेत. त्यात 770 हून अधिक बंदी खुल्या वातावरणाच्या सहवासात आहेत. तसेच महाराष्ट्रातील खुल्या तुरुंगांची संख्या देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. या खुल्या कारागृहात शेती, सुतारकाम, मूर्तीपूजक, साडी आणि कापड तयार करणे अशा विविध कला शिकविल्या जाणार आहेत. तर येथे तयार होणारी उत्पादनांची विक्रीही करण्यात येणार आहे.

राज्यातील कारागृहांमध्ये बंदी पुनर्वसनाचा कार्यक्रम व्यापक प्रमाणात राबविला जात आहे. पूर्वी केलेल्या चुकांचे प्रायश्‍चित्त करताना या बंदींना एक माणूस म्हणून जगण्याची एक संधी देण्याचा यामागे हेतू आहे. यासाठी राज्यातील अनेक कारागृहांमध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबविले जातात. आता कारागृहाच्या सुधारणांचा एक भाग म्हणून, खुले कारागृह ही एक संकल्पना सुरू करण्यात आली आहेे. अशा प्रत्येक उपक्रमामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक खुले कारागृह उभारणे समाविष्ट आहे. यासाठी येरवडा कारागृहाप्रमाणे रत्नागिरीतील विशेष कारागृहासह सिंधुदुर्ग, धुळे, यवतमाळ, लातूर तसेच वर्धा येथे लवकरच सहा खुल्या कारागृहांची संकल्पना राबविण्यात येणार आहे. 

रत्नागिरीच्या विशेष कारागृहात हे खुले कारागृह व्हावे, यासाठी 2012 मध्येच प्रस्ताव पाठविण्यात आला असून, आता त्यावर अंतिम कार्यवाही सुरू असून, लवकरच हा निर्णय होईल, अशी माहिती कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख यांनी दिली.