Thu, Aug 22, 2019 14:55होमपेज › Konkan › रत्नागिरीकरांवरच रुसला फळांचा राजा

रत्नागिरीकरांवरच रुसला फळांचा राजा

Published On: May 16 2019 2:06AM | Last Updated: May 16 2019 2:06AM
दापोली ः प्रवीण शिंदे

रत्नागिरी हापूस अशी जगभरात ख्याती असलेला फळांचा राजा रत्नागिरीकरांवर यावर्षी रुसला असून जिल्ह्यात अवघे 30 टक्के उत्पन्न बागायतदारांच्या हाती लागले आहे.

जिल्ह्यात 1 लाख 50 हजार हेक्टर एवढी आंबा लागवड आहे. गेल्या काही वर्षांपासून कोकणातील जंगले तोडून तसेच शेतजमिनीतही मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करण्यात आली आहे. आंब्याचे फळ हे हवामानाच्या दृष्टीने नाजूक आहे. हवामानातील बारीकसारीक बदलांचा या पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. आंबा पिकासाठी 72 दिवस थंडी आवश्यक असते. मात्र, यावर्षी थंडी हंगाम जवळ जवळ 97 दिवस होता. या काळात मोहर मोठ्या प्रमाणात आला. मात्र, संयुक्त फुलांचे प्रमाण घटले. अधिक फळधारणा होण्यासाठी संयुक्त फुलांची सरासरी टक्केवारी ही 11 टक्के असणे आवश्यक असते. मात्र, यावर्षी ती पाच ते सहा इतकीच दिसून आली. त्यामध्ये फुलकीड व तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव फळ पिकासाठी हानिकारक ठरला. त्याचबरोबर अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, नर मोहराचे प्रमाण अधिक अशी विविध कारणे जिल्ह्यातील आंबा फळधरणेवर विपरित परिणाम करणारी ठरली. 

यावर्षी आंबा पीकही उशिराने बाजारात आले. हापूसचा गेल्या आठवडाभरापासून दर कमी झाला आहे. सध्या डझनचा भाव 300 रुपयांच्या आसपास सुरू आहे.  सर्वाधिक उत्पन्न देणार्‍या हापूस आंब्याने यावर्षी मात्र बागायतदारांची दाणादाण उडवली आहे.

सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात हापूस झाला आहे. याचेच उदाहरण कॅनिंग आंब्याच्या दरावरून घेऊ शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॅनिंगचा आंबा 22 रुपये किलो दराने घेतला जात आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात सध्या हाच दर 26 रुपये आहे.

शेतकर्‍यांनी पारंपरिक शेतीकडे पाठ फिरवली व शासकीय योजनेतून मोठ्या प्रमाणात आंबा लागवड केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 टक्के आंबा बाजारात विक्रीसाठी गेला असून, आता 30 टक्केच आंबा शिल्लक आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा पाहिजे तसा आंबा बाजारात गेलेला नाही. अद्यापही मोठ्या प्रमाणात हापूस हा झाडावर आहे. या काळात निसर्गाने धोका दिल्यास याचा फटका आंबा उत्पादकांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे.

अनेक शेतकरी हे रासायनिक खतांचा वापर करत असल्याने झाडांचे आयुष्यमान कमी होत आहे. त्याचबरोबर कल्टार वापरलेल्या फळाला परदेशात स्वीकारले जात नाही. त्यामुळे सध्या सजक आंबा बागायतदार हे विषमक्त बागायतीकडे वळू लागले आहेत. भविष्यात यातून चांगले परिणाम मिळतील, अशी तज्ज्ञांना खात्री आहे. यावर्षी आंबा बागायतदारांना कमी उत्पन्नाचा मोठा फटका बसला असून बागांच्या देखभालीसाठी लागलेला खर्चही यातून निघणार नसल्याने त्यांची आर्थिक गणिते कोलमडणार आहेत. स्थानिक मजूर वर्ग मिळत नसल्याने अनेक बागायतदार नेपाळ आदी ठिकाणांहून मजूर आणून बागांमध्ये कामाला ठेवतात. बोलावलेल्या मजुरांना परत पाठवता येत नाही. त्यामुळे आंबा कमी आला तरी त्यांचे त्यांना पैसे द्यावे लागतात. त्याचबरोबर बागांच्या देखभालीसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. मात्र, आंबा उत्पादन घटल्याने या सर्व गोष्टी बागायतदारांच्या अंगावर पडणार आहेत. त्यांची आर्थिक गणिते कोलमडणार असून शासनाने आंबा नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी छोटे-मोठे सर्वच आंबा बागायतदार करत आहेत.

फळधारणेच्या वेळी किडीचा प्रादुर्भाव : तांबे

रासायनिक फवारणीमुळे आंबा पिकावर विपरित परिणाम होतो. यासाठी सेंद्रिय फवारणीचा वापर करण्यात आला. मात्र, फळधारणेच्या वेळी कीड पडल्याने हापूसची फळधारणा अल्प प्रमाणात झाली. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले आहे, असे मत आंबा उत्पादक प्रकाश तांबे यांनी व्यक्त केले.