होमपेज › Konkan › वाढदिवसादिवशीच सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू 

वाढदिवसादिवशीच सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू 

Published On: Dec 09 2017 11:41PM | Last Updated: Dec 09 2017 11:41PM

बुकमार्क करा

रत्नागिरी: प्रतिनिधी

लांजा तालुक्यासह राजापूर, रत्नागिरी शहरात सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुजित कांबळे (वय ४०,रा.लांजा ) यांचा वाढदिवसा दिवशीच सर्पदंशाने मृत्यू झाल्याने लांजा शहरावर शोककळा पसरली आहे. उपचारादरम्यान शनिवारी रात्री  साडेआठ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

सुजित कांबळे शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लांजा शहरानजिक असलेल्या कुवे येथे कामानिमित्त गेले होते. मुख्य रस्त्यावर दुचाकी उभी करून ते उभे असताना बाजूच्या गवतातून आलेल्या कोबरा जातीच्या सर्वाधिक विषारी असलेल्या सापाने त्यांना दंश केला. पायाला दंश करून जाणाऱ्या सपाला त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी त्याच अवस्थेत त्यांनी घरी फोन करून, मला विषारी  साप चावला असून मी कुवे येथे आहे. मला रुग्णालयात न्यायला या, असे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ कुवे येथे धाव घेतली.

नातेवाईक, मित्र कुवे येथे पोहचले तेव्हा सुजित कांबळे दुचाकीवर डोके टेकून बसले होते. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथे उपचार करून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री साडेसात वाजता त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सुजित यांचा मृत्यू झाला.

सुजित यांचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. काही तासांपुर्वी घरातून गेलेले सुजित कांबळे वाढदिवस असल्यामुळे लवकर घरी येणार होते. ते घरी येण्याऐवजी त्यांच्या मृत्यूचे वृत्त घरी पोहचल्यानंतर सर्वत्र सन्नाटा पसरला. सर्व सर्पमित्रासह लांजावासियांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तर रत्नागिरीतील सर्व सर्पमित्रहि जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.

गेली सहा ते सात वर्ष सर्पमित्र म्हणून तसेच संगीत श्रेत्रात पंचक्रोशीत लोकप्रिय असलेल्या सुजित यांच्या मृत्यूच्या वृत्ताने सर्वांना धक्का बसला. त्यांचे लांजा शहरात संगणकाचे दुकान होते. ते काम करून आपला छंद जोपासताना जनतेला सेवा देत होते. त्यांच्या पश्चात  पत्नी, दोन छोटी मुले असा परिवार आहे.