होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : रेल्वेतून पडून मृत्यू

सिंधुदुर्ग : रेल्वेतून पडून मृत्यू

Published On: Feb 24 2018 9:24PM | Last Updated: Feb 24 2018 9:09PMकुडाळ ः वार्ताहर

कोकण रेल्वे मार्गावर तेर्सेबांबर्डे कोरगावकर टेंबवाडी येथे रेल्वेतून पडून बीएसएनएल विभागाचे कर्मचारी शरदचंद्रन भास्करन नायर (रा. कोटरकरा केरळ) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी 9 च्या सुमारास दिवा पॅसेंजरमधून जाणार्‍या प्रवाशांच्या निदर्शनास आली. नायर हे नेमके कोणत्या गाडीतून पडले, याबाबत माहिती मिळालेली नाही. यानुसार दिवा पॅसेंजरच्या चालकाने कुडाळ रेल्वेस्थानकात माहिती देताच पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. नायर हे गेल्या दोन वर्षांत कुडाळ, कणकवली-फोंडा, ओरोस येथील बीएसएनएल विभागामध्ये ज्युनिअर टेलिफोन ऑपरेटर या पदावर कामाला होते. यानंतर त्यांची गेल्या काही दिवसांपूर्वीच गोवा येथे बदली झाली होती.

 त्यांच्या खिशात सापडलेल्या रेल्वेच्या तिकिटावरून ते गेले दोन दिवसांपूर्वी केरळ येथे गेले होते. त्यांच्या खिशामध्ये कोचिवली भावनगर एक्स्प्रेस या रेल्वेचे 23 फेब्रुवारीचे तिकिट सापडले. यानंतर त्यांच्याकडे कर्मळी ते सावंतवाडी असेही एक रेल्वेचे तिकिट सापडले आहे. यावरून ते गोवा येथून सावंतवाडी येथे प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, ते कुडाळ येथे का येत होते? किंवा त्यांना सावंतवाडी येथे उतरण्यास समजले नसल्याने ते चुकून पुढे आले असावे या गोंधळलेल्या स्थितीमुळे हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिस सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. दिवा पॅसेंजरमधील प्रवाशांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर या गाडीच्या चालकाने याबाबत कुडाळ रेल्वे स्थानकात माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोलिस रवाना झाले. घटनास्थळी त्याच्या खिशात मतदान ओळखपत्र सापडले असून यावरूनच त्याची ओळख पटली. यावेळी त्याच्या खिशात अन्य कागदपत्रांसह काही रोख रक्‍कमही होती. ही सर्व कागदपत्रे रेल्वे ट्रॅकवर विखुरलेल्या स्थितीत आढळली. याबाबतच माहिती मिळताच कुडाळ बीएसएनएलच्या कर्मचार्‍यांनी कुडाळ पोलिस स्थानकात भेट दिली. यावरून त्यांच्याबाबत सविस्तर माहिती मिळाली. यानंतर त्यांच्या केरळ येथील नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली असून तोपर्यंत त्यांच्या मृतदेह ओरोस येथील शवागृहात ठेवण्यात आला आहे.