Mon, Jan 27, 2020 12:09होमपेज › Konkan › आईला वाचवायला गेला अन्...

आईला वाचवायला गेला अन्...

Published On: Jul 04 2019 1:59AM | Last Updated: Jul 03 2019 11:40PM
चिपळूण : प्रतिनिधी 

तिवरेतील सर्वांचा लाडका असणारा राजा आज या शोध किंवा मदतकार्यात कुठेही दिसत नव्हता... प्रत्येकाच्या तोंडात राजाचीच आठवण निघत होती. चांगला पोरगा गेला.. पोहण्यात तरबेज, हसतमुख व हुशार असा राजा आईला वाचवायला गेला अन् हे मायलेकरू प्रवाहात विलीन झाले. अशा नि:शब्द भावना या ठिकाणी येणार्‍या प्रत्येकाकडून व्यक्‍त होत होत्या. त्याचा लाडका भाऊ शुभम तर दादाच्या नावाने हंबरडा फोडून ढसाढसा रडत होता. हे द‍ृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.

रात्री तिवरेतील धरण फुटले आणि हाहाकार उडाला. ही बातमी भेंदवाडीत पसरल्यानंतर सर्वांचीच दातखिळ बसली. अनेकांनी घरातील सामान आवरण्याच्या नादात आपला जीव गमावला. मात्र, संदेश ऊर्फ राजा याने आईला वाचवतानाच स्वत:चा प्राण गमावला. रात्री घटना घडल्यानंतर राजा आपला भाऊ शुभम याला सुरक्षित स्थळी उंच टेकडीवर 
घेऊन गेला. अंगाने धडधाकट असणार्‍या राजा याने आजीला पाठीवर उचलून घेतले आणि तिलादेखील सुरक्षित स्थळी नेले. आता एकटी आई राहिली आहे. तिला सुखरूप आणतो असे सांगून राजा घरामध्ये गेला. मात्र, इतक्यातच पाण्याचा जोरदार लोंढा आला. त्या बरोबर ही मायलेकरे वाहून गेली. राजाच्या जाण्याने तिवरे ग्रामस्थांतून तीव्र शोक व्यक्‍त होत आहे. त्याची आजी हंबरडा फोडून राजाच्या आठवणी सांगत आहे. राजा आजीला, ‘माझे दंड कसे आहेत बघ! मी नदी पार करतो. महाविद्यालयात जातो. सर्वांना सुखी करतो’ असा सांगणारा राजा अचानक कसा गेला असा शोक त्याची आजी करीत होती. दुसर्‍या बाजूला तोंडातून शब्दही न फुटणारा शुभम दादासाठी शोक करीत होता. त्यांचे वडील पुणे येथे नोकरीला असतात. दुपारपर्यंत ते घटनास्थळी पोहोचले नव्हते. आई व दादा एकाचवेळी सोडून गेल्यामुळे चिमुकला शुभम मेटाकुटीला आला होता. त्याला रडण्यासाठी शब्दही फुटत नव्हते. प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थांनी त्याला धीर दिला. त्यानंतर मात्र त्याच्या दु:खाला बांध फुटला व तो ढसाढसा रडू लागला.