Sat, Sep 22, 2018 01:24होमपेज › Konkan › खेडचे भरकटलेले विमान सोशल मीडियावर

खेडचे भरकटलेले विमान सोशल मीडियावर

Published On: Jun 19 2018 10:47PM | Last Updated: Jun 19 2018 8:26PMखेड : प्रतिनिधी

शहरात सध्या प्रत्येक नाक्यावर विमान प्रकरणाचीच चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरदेखील रंगलेले राजकीय दावे व प्रतिदाव्यांच्या नाट्याने नागरिकांची चांगलीच करमणूक सुरू आहे. या विमान प्रकरणानंतर शिवसेना व ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांकडून आपले मुद्दे मांडण्यासाठी आता व्यंगचित्रांचा आधार घेतला जात आहे.

जगभरामध्ये व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यातून एखाद्या विषयाची मांडणी होणे ही किती प्रभावी ठरते याची चर्चा सातत्याने होत असते. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण आदी दिग्गज व्यंगचित्रकारांनी देशातील विविध काळात विविध राजकीय, सामाजिक परिस्थितीची मांडणी व्यंगचित्रांच्या माध्यमातून करीत समाजमनावर त्याचा परिणाम केलेला दिसून येतो. खेड शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विमान प्रकरणामध्ये शिवसेना व नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यामध्ये दावे व प्रतिदावे होत आहेत.

नगराध्यक्ष वैभव खेडेकर व शिवसेनेचे शहरप्रमुख निकेतन पाटणे यांनी दररोज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप व टीका करण्यास सुरुवात केली आहे. ‘मनसे’चे महाराष्ट्र सैनिक व शिवसैनिक त्यांच्या नेतृत्वाच्या समर्थनात सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. त्यातच आता व्यंगचित्रांच्या माध्यमांतून मनसैनिक व शिवसैनिकांमध्ये टीका-टिपणी होऊ लागल्याने तो एक चर्चेचा विषय बनला आहे. व्यंगचित्र काढणार्‍या कलाकारांना या निमित्ताने भाव मिळत असल्याने त्यांचा भाव वधारल्याची चर्चा असून विमान प्रकरणाचा शेवट काय होतो, याबाबत उत्सुकता आहेच. परंतु, सोबतच सध्या व्यंगचित्रांमुळे नागरिकांचे मनोरंजन होत आह हे मात्र निश्‍चित.