Sat, Jun 06, 2020 19:13होमपेज › Konkan › हृदयविकाराने आंब्याच्या झाडावरच वृद्धाचा मृत्यू

हृदयविकाराने आंब्याच्या झाडावरच वृद्धाचा मृत्यू

Published On: May 30 2018 2:19AM | Last Updated: May 29 2018 10:50PMराजापूर : प्रतिनिधी

हापूस आंबे काढण्यासाठी झाडावर चढलेल्या वृद्धाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा झाडावरच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी राजापुरात घडली. रमाकांत गणपत चव्हाण (वय 75) त्यांचे नाव आहे. 

राजापूर शहरातील न्यायालयासमोर राहणारे रमाकांत चव्हाण यांच्या घराच्या पाठीमागे त्यांची आंबा, काजूची बाग आहे. मंगळवारी सकाळी त्यांनी आंबे काढण्यासाठी एका मजुराला बोलावले होते. तो येईपर्यंत आपण पुढे होऊ, या बेताने ते बागेत गेले. हापूस आंब्याच्या बाजूला असलेल्या एका झाडावर सुमारे 50 फूट उंच चढून ते आंबे काढत होते. मात्र, आंबे काढत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे ते झाडाच्या फांदीला अडकून पडले होते.

दरम्यान,  बोलावलेला मजूर त्यांच्या घरी आला. पत्नीकडून ते मागे बागेत असल्याचे कळल्याने तो  बागेत गेला. मात्र, त्याला झाडाच्या एका फांदीवर निपचित पडलेले चव्हाण पाहून तो घाबरला. त्याही परिस्थितीत त्याने मुख्य रस्त्यावरील दुकानदार नरेंद्र पावसकर यांना याबाबत सांगितले. पावसकर व त्यांची काही मित्रमंडळी घटनास्थळी गेली. त्यातील कुणीतरी झाडावर चढून त्यांना पाणी पाजले. 

याबाबत राजापूर पोलिसांना खबर देण्यात आली. त्यांनीही विलंब न करता त्यांना झाडावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. नगरपरिषदेची शिडी आणून झाडावर चढून चव्हाण यांना खाली उतरविण्यात आले. लगेचच त्यांना राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.