Wed, Feb 20, 2019 01:17होमपेज › Konkan › लाडघर येथे वृद्धाचा खून

लाडघर येथे वृद्धाचा खून

Published On: May 29 2018 1:37AM | Last Updated: May 28 2018 10:34PMदापोली : वार्ताहर

तालुक्यातील लाडघर येथे किरकोळ वादातून एकाने वृद्धाला कुर्‍हाडीने वार करीत ठार केले. विठ्ठल सोनू हरावडे (वय 70)असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. यातील संशयित सुनील महादेव गोवले (40) याला अटक केली आहे. 

याबाबत मृत वृद्धाचा पुतण्या लक्ष्मण गोपाल हरावडे यांनी दापोली पोलिसांना खबर दिली. लक्ष्मण हरावडे हे आपल्या घरी दुपारी जेवत असताना त्यांना शेजारील सुनील गोवले यांच्या घरात ‘मारले-मारले’असा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर ते आपल्या पत्नीसह घराबाहेर पडले आणि त्यांनी सुनील गोवले याच्या घराकडे धाव घेतली त्यावेळी आपले काका विठ्ठल सोनू हरावडे हे  गोवले याच्या अंगणात रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.

याचवेळी शेजारी असलेल्या सुनील गोवले याच्या हातात रक्‍ताने माखलेली कुर्‍हाड होती.शिवाय, त्याच्या कपड्यावर रक्‍ताचे डाग उडालेले होते. यावेळी आरोपी सुनील याने मी याला ठार मारले असे सांगितले. त्यानुसार लक्ष्मण हरावडे यांनी पोलिसांत खबर दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भोये करीत आहेत. 
मृत वृद्धानेही केला होता भावाचा खून 

या घटनेत मृत झालेले विठ्ठल सोनू हरावडे यांनीही पंधरा वर्षांपूर्वी आपल्या भावाचा खून केला होता. त्यात त्यांना 14 वर्षांचा तुरुंगवास झाला होता. शिक्षा भोगून ते गावी आले होते. त्यांना त्यांच्या पुतण्याने आधार दिला होता. तर संशयित सुनील गोवले याच्याबरोबर त्यांचे अनेकवेळा खटके उडत होते. अशातून ही घटना घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.