Thu, Apr 25, 2019 15:25होमपेज › Konkan › उद्दिष्टपूर्ती न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई

उद्दिष्टपूर्ती न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई

Published On: Feb 28 2018 1:15AM | Last Updated: Feb 27 2018 10:31PMरत्नागिरी : प्रतिनिधी

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या फळलागवड योजनेत साडे तेरा हजार हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट असताना त्यापैकी  साडेअकरा हजार हेक्टर क्षेत्रात लागवडीला तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही दोन हजार हेक्टरवर लागवड न करणार्‍या अधिकार्‍यांवर प्रशासनातर्फे कारवाईची तयारी करण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी असलेल्या या योजनेत जिल्हाधिकार्‍यांनी प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाखोंची उलाढाल होणार आहे. यासाठी महसूल यंत्रणा कामाला लागली असून ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांना इष्टांकाची निश्‍चिती करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात दोन फळ लागवड तांत्रिक अधिकारी देण्यात आले असून प्रत्येक शेतकर्‍याला 1 लाखाचे अनुदान देण्यात येणार आहे.

कृषी विस्तार अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार्‍या या योजनेत रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येणार आहे. प्रामुख्याने उत्पादक फळ लागवडी अंतर्गत आंबा आणि काजूची लागवड करण्यात येणार असून कोकणात दुर्मीळ होऊ लागलेल्या कोकम, जांभूळ या फळांची लागवड करण्यात येणार आहे. मात्र, यामध्ये प्रामुख्याने काजू लागवडीवर भर देण्यात येणार आहे. सुमारे 7 हजार हेक्टर क्षेत्र या योजनेत काजू लागवडीखाली प्रस्तावित करण्यात आले आहे तर 13 हजार हेक्टर क्षेत्रापैकी 6 हजार क्षेत्र आंबा लागवडीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.