Wed, Apr 24, 2019 21:30होमपेज › Konkan › पालकमंत्र्यांच्या ‘भरपाई फॉर्म्युल्यास’ भाजपचा विरोध!

पालकमंत्र्यांच्या ‘भरपाई फॉर्म्युल्यास’ भाजपचा विरोध!

Published On: Dec 11 2017 1:31AM | Last Updated: Dec 10 2017 9:07PM

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी

ओखी चक्रीवादळात किनारपट्टी भागात नुकसान झालेल्या मच्छीमारांना फयानच्या धर्तीवर नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. मात्र, याला तालुका भाजपचा विरोध आहे कारण फयान वादळातील नुकसानग्रस्त मच्छीमारांना घातलेल्या अटी या जाचक होत्या. या वादळात पारंपरिक मच्छीमारांच्या जुन्या जाळ्यांचे नुकसान झाले असून त्यांना त्याच्या पावत्या देणे शक्य होणार नाही. जाचक अटी शिथिल करून मुख्यमंत्री आपत्कालीन निधीतून या मच्छीमारांना मदत मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली.

केनवडेकर म्हणाले, जिल्ह्याच्या किनारपट्टी भागास ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसला. यातील देवबाग, वायरी, तोंडवळी, तळाशील, आचरा या भागातील परिस्थितीचा भाजपने  आढावा घेतला. महसूल यंत्रणेकडून नुकसानीचे होणारे पंचनामे हे शासकीय दृष्टिकोनातून बरोबर असले तरी मत्स्य व्यवसाय खात्याकडून पंचनामे होणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित विभागाकडे विनंती केल्यानंतर तळाशिल, तोंडवळी, वायरी येथील रापणकर मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.  

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नुकसानग्रस्त मच्छिमारांना ‘फयान’च्या धर्तीवर नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे.  मात्र, याला भाजपचा विरोध आहे. कारण फयान वादळाच्यावेळी मच्छीमारांच्या होड्यांचे, जाळ्या वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या वेळी नुकसान भरपाई साठी मच्छीमारांना कर पावत्या सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. 

ओखी वादळात पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या जाळ्या जुन्या असल्याने तसेच त्यांची दुरुस्ती करून त्या वापरल्या जात असल्याने पारंपरिक मच्छीमार जाळ्यांच्या पावत्या सादर करू शकत नाही. परिणामी ते नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहू शकतात. दरम्यान भाजपने याबाबत बंदरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण  व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याशी चर्चा केली आहे.

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनीही श्री. जानकर यांच्याशी चर्चा करत नुकसानीचा पंचनामा करून मच्छीमारांना मदत मिळवून द्यावी, असे सांगितले आहे. तामिळनाडू सरकारने त्यांच्या मच्छीमारांना शासकीय मदत मिळवून दिली आहे त्याच धर्तीवर मुख्यमंत्री आपत्कालीन निधीतून येथील नुकसानग्रस्त मच्छीमारांना मदत मिळावी यासाठी भाजप प्रयत्नशील  असल्याचे श्री. केनवडेकर यांनी सांगितले.