Tue, Mar 19, 2019 12:12होमपेज › Konkan › सात होड्यांना जलसमाधी

सात होड्यांना जलसमाधी

Published On: Dec 06 2017 1:45AM | Last Updated: Dec 05 2017 11:04PM

बुकमार्क करा

वेंगुर्ले : प्रतिनिधी 

ओखी वादळाच्या तडाख्यानंतर किनार्‍यांवर गेल्या दोन दिवसांपासून तुफानसद‍ृश परिस्थिती निर्माण झाली असून उंचच उंच लाटा समुद्रकिनार्‍यावर धडकत होत्या. मंगळवारी पहाटेच्या सुमारास वेंगुर्ले बंदरात नांगरून ठेवलेल्या 7 फायबर होड्या समुद्रात बुडाल्याने सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. दरम्यान, मंगळवारी सकाळपासून मान्सूनसद‍ृश परिस्थिती निर्माण झाली असून पहाटेनंतर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.

केरळ व तामिळनाडू किनार्‍यावर आलेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम येथील किनारपट्टीवर जाणवत असून याचा फटका या भागातील मच्छीमार, रहिवाशांना बसला आहे. काही ठिकाणी वस्तीत पाणी घुसण्याची, मच्छीमारांची जाळी वाहून जाण्याचे प्रकार सोमवारी घडले. तर सोमवारी मध्यरात्री दीड ते मंगळवारी पहाटे 6 च्या सुमारास मोठ्या बोटींवर बर्फ, खलाशी व इतर सामान यांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या 7 फायबर बोटी वेंगुर्ले बंदरात बुडाल्या. यामध्ये हर्षल रेडकर यांची गणपती कृपा, सुविधा रेडकर यांची ओम हरी कृष्ण, प्रल्हाद केळुसकर यांची ब्राह्मण कृपा, मोजेस फर्नांडिस यांची आवेमारीया, कैतान फर्नांडीस यांची नोवा, पांडुरंग मालवणकर यांची धन्वंतरी, आनाजी तांडेल यांची माऊली या बोटींचा समावेश आहे. प्रत्येकी 30 ते 35 हजार किमतीच्या या होड्या असल्याने सुमारे अडीच ते 3 लाखांचे नुकसान झाले आहे. सकाळी या नुकसानीची तहसीलदार शरद गोसावी, मंडल अधिकारी व्ही. एम. तुळसकर, तलाठी व्ही. एन. सरवदे यांनी पहाणी करुन तहसीलदार गोसावी यांनी मत्स्य विभागास पंचनाम्याचे आदेश दिले. यावेळी वसंत तांडेल, प्रल्हाद केळुसकर, बाबी रेडकर, मनोहर तांडेल, मोजेस फर्नांडीस यांसह मच्छीमार उपस्थित होते.

तालुक्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण व वार्‍याच्या प्रमाणात वाढ झाली असून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. तर येथील प्राथमिक शाळा, हायस्कूल, महाविद्यालये यांना खराब हवामानामुळे शासनाच्या आदेशानुसार सुट्टी देण्यात आली आहे.