Mon, May 20, 2019 18:40होमपेज › Konkan › चक्रीवादळ नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा : आ. वैभव नाईक

चक्रीवादळ नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा : आ. वैभव नाईक

Published On: Dec 06 2017 1:45AM | Last Updated: Dec 05 2017 10:57PM

बुकमार्क करा

मालवण :  वार्ताहर 

ओखी चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर आ. वैभव नाईक यांनी बंदर जेटी, दांडी, देवबाग  किनारपट्टी भागास भेट देत मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करण्यात यावेत अशा सूचना त्यांनी संबंधित विभागास दिल्या. 

चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या सागरी उधाणात किनारपट्टी भागातील मच्छीमारांच्या जाळ्या समुद्रात वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मच्छीमारांच्या नुकसानीचे पंचनामे न झाल्याने आ. नाईक यांनी पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी चर्चा केली. त्यानुसार संबंधित विभागास तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. उधाणाच्या तडाख्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या कुबल रापण संघ व तोडणकर रापण संघ यांची पाहणी करून त्यांना मदत सुपूर्द केली. तसेच नुकसान भरपाई मिळवून देण्यासंबंधी मत्स्य विभागास सूचना केल्या. ज्या मच्छीमारांचे नुकसान झाले आहे त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही केली जाईल असे आ. नाईक यांनी स्पष्ट केले. 

दांडी, देवबाग येथील नुकसानीच्या पाहणीबरोबर येथील बंदर जेटीस आ. नाईक यांनी भेट देत पोलिसांच्या बुडालेल्या गस्तीनौकेची माहिती घेतली. यावेळी जि. प. सदस्य हरी खोबरेकर, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, जान्हवी खोबरेकर, भाई ढोके, बाबी जोगी, गणेश कुडाळकर, तपस्वी मयेकर, महेंद्र म्हाडगूत, रमेश कद्रेकर, स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी व मच्छीमार उपस्थित होते.