Tue, Mar 26, 2019 01:34होमपेज › Konkan › ओखी चक्रीवादळ अखेर सुरतला विसावले!

ओखी चक्रीवादळ अखेर सुरतला विसावले!

Published On: Dec 06 2017 1:45AM | Last Updated: Dec 05 2017 11:06PM

बुकमार्क करा

सिंधुदुर्ग : गणेश जेठे

तामिळनाडू राज्याचा रामेश्‍वरम किनारा आणि श्रीलंका देश यांच्या बरोबर मध्ये असलेल्या रामसेतूजवळ धनुष्यकोटीपासून काही अंतरावर ओखी चक्रीवादळ निर्माण झाले. या चक्रीवादळाने गेल्या आठवड्याभराच्या प्रवासात अनेकांचे बळी घेतले आणि कोट्यवधींचे नुकसानही केले. हे चक्रीवादळ अखेर मंगळवारी सायंकाळी सात वाजता सुरतमध्ये जाऊन विसावले असल्याचे भारतीय हवामान खात्याचे दिनेश मिश्रा यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

मंगळवारी सकाळपासूनच हे वादळ कमजोर झाले आणि भारतीय हवामान खात्याने या वादळाबाबत माहिती देणारे दर तासाला प्रसिद्ध केले जाणारे बुलेटीन थांबवले. मंगळवारचा दिवस कोकणातील महाविद्यालयीन आणि शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुट्टीचा दिवस होता. राज्य सरकारने वादळ पश्‍चिम किनारपट्टीपासून 230 कि.मी. अंतरावर असल्याचा इशारा मिळताच मुलांना धोका पोहोचू नये यासाठी हा निर्णय घेतला होता. दुपारपर्यंत हे वादळ पश्‍चिम किनारपट्टीवरील मुंबईपासून 230 कि.मी. अंतरावर होते आणि ते उत्तर-पूर्वेला सरकत सुरतमध्ये पोहोचले.  
आठवडाभरापूर्वी या वादळाची निर्मिती बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे झाली होती. हिंद महासागरातून हे वादळ तामिळनाडू आणि श्रीलंकेला तडाखा देत पूर्वेकडे लक्षद्वीपकडे सरकले होते. त्या दरम्यान कन्याकुमारी आणि दक्षिण केरळमधील त्रिवेंद्रम व इतर भागात या वादळाने धुमाकूळ घातला होता. तामिळनाडू आणि केरळमधील अनेकांचे बळी गेले. मच्छिमारी नौका बुडाल्या. मच्छिमारांच्या जाळ्या वाळून गेल्या. या काळात मुसळधार पर्जन्यवृष्टीही झाली. दक्षिणेकडील जनजीवन विस्कळीत झाले. लक्षद्वीपहून या वादळाने दिशा बदलली आणि ते उत्तरेकडे सरकू लागले. केरळ-कारवारच्या पश्‍चिम किनारपट्टीपासून ज्यावेळी हे वादळ 700 कि.मी.वर होते, ओमान देशाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झाला आणि हळूहळू पुन्हा ते उत्तर-पूर्वेकडे सरकू लागले. महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीच्या जवळ ते येऊ लागले.
    
मच्छिमारही देवगड बंदरात 

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ येताना वादळ हळूहळू कमजोर बनत चालले होते. तरीही या वादळाचा तडाखा बसलाच. केरळ किनारपट्टीवर धुमाकूळ घालत असल्याची माहिती जेव्हा महाराष्ट्र किनारपट्टीवर मासेमारी करणार्‍या केरळ आणि तामिळनाडू या राज्यातील मच्छिमारांना मिळाली त्यावेळी त्या मच्छिमारांनी दक्षिणेकडे आपल्या घरी परतण्याचे धाडस सोडून दिले. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरक्षित देवगड बंदर आश्रयासाठी निवडले. वादळाची वाटचाल गुजरात राज्यातील सुरतच्या दिशेने सुरू झाल्यावर मात्र अरबीसमुद्रातील गुजरातचे मच्छिमारही देवगड बंदरात दाखल झाले. सोमवारी हजारो नौका देवगड बंदरात जमल्या होत्या. हे वादळ कोकण आणि मुंबईपासून जवळ अंतरावर येत आहे असा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली होती. कोकणात आणि मुंबईत सकाळपासून पाऊस सुरू होता. कोकण किनार्‍यावर मोठ्या लाटा धडकत होत्या. अखेर हे ओखी वादळ सूर्य मावळताच सुरतमध्ये विसावले.