Tue, May 21, 2019 04:06होमपेज › Konkan › ‘ओखी’चा तडाखा;अ‍ॅलर्ट कायम 

‘ओखी’चा तडाखा;अ‍ॅलर्ट कायम 

Published On: Dec 06 2017 1:45AM | Last Updated: Dec 05 2017 11:13PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

‘ओखी’मुळे वेगवान वारे व पावसाने कोकण किनारपट्टीला अक्षरश:  झोडपून काढले. वादळाच्या तडाख्याने किनारपट्टीलगतच्या घरांमध्ये पाणी घुसले. वादळ गुजरातच्या दिशेने सरकले असले तरी  किनारपट्टीवरील नागरिकांच्या मनात भीती कायम आहे. दरम्यान, पुढील 24 तास धोका कायम राहणार आहे.

वादळाच्या प्रभावामुळे कोकण किनारपट्टी भागात मंगळवारीही भीती कायम होती. दरम्यान, खबरदारी म्हणून मंगळवारी शाळा महाविद्यालयासह खासगी कंपन्यांही बंद ठेवण्यात आल्या होत्या. मंगळवारी किनारपट्टी भागात अजस्त्र लाटांच्या तांडवाने ‘ओखी’चा प्रभाव कोकण किनारपट्टी भागात  चांगलाच जाणवत होता. जिल्ह्यातील मांडवी, हर्णै, मिरकरवाडा तिवरी बंदर येथे अजस्त्र लाटांच्या मार्‍यामुळे किनारपट्टीचा भाग ढासळला. 

कोकण किनारपट्टी भाग 3 ते 6 डिसेंबर या कालावधीत ‘ओखी’च्या प्रभावाखाली राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. यानुसार कोकण किनारपट्टी भागातील पाचही जिल्ह्यांमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यात आला होता. जिल्हा प्रशासनांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून मंगळवारी या जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि खासगी कंपन्यांनीही सुट्टी  जाहीर केली होती.  मंगळवारी मध्यरात्री किनारी भागात  समुद्राने रौद्ररुप धारण केले होते. किनार्‍यावर  अजस्त्र लाटा उसळी घेेत असल्याने किनारी गावातही प्रशासनाने सतर्कता बाळगताना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली होती.
वादळामुळे रत्नागिरीत तालुक्यात मांडवी, मिर्‍या तसेच तिवरी बंदरासह गावखडी, पूर्णगड, आरेवारे आदी किनारी भागात सागरी थैमान सुरु होते.

पलाटांनी शेतजमिनीची हानी 

रत्नागिरी ः प्रतिनिधी  पूर्णगड आणि गावखडी भागात सागरी लाटांनी शेतजमिनीची हानी केली. या भागात अनेक घरांतही भरतीचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या कालावधीत वार्‍याचा वेग ताशी 50 ते 60 कि.मी. असल्याने अनेक किनारी भागात पडझड झाली. मांडवी भागात   सागरी लाटांनी सीमा ओलांडून किनार्‍यावर थडकत किनार्‍यावर असलेल्या जोंधळ्या मारुतीच्या कठड्याची हानी केली. गणपतीपुळे-वरवडे दरम्यानच्या तिवरी बंदर येथेही लाटाच्या मार्‍यामुळे किनार्‍यालगत असलेला रस्ता वाहून गेला.

मंगळवारी सकाळी ओखीचा प्रभाव अवकाळी पावसाच्या स्वरुपात प्रगटला होता. अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी झाल्या. मिरकरवाडा बंदरातही  ‘ओखी ’च्या सुसाट वार्‍याचा प्रभाव असल्याने परजिल्ह्यांतील नौकाही बंदरातच नांगरलेल्या स्थितीत होत्या.  या परजिल्ह्यांतील मच्छीमारांसाठी  प्रशासनाच्या वतीने  सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला  असल्याचे पुरवठा अधिकारी फड यांनी सांगितले. दरम्यान, चक्रीवादळाचा प्रभाव  बुधवारीही कायम राहणार असल्याने कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले.